समस्यांच्या विळख्यात आश्रमशाळा

By Admin | Published: July 20, 2016 01:07 AM2016-07-20T01:07:42+5:302016-07-20T01:07:42+5:30

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने आदिवासी

Ashramshala in the midst of problems | समस्यांच्या विळख्यात आश्रमशाळा

समस्यांच्या विळख्यात आश्रमशाळा

googlenewsNext

सोयीसुविधांचा अभाव : शौचालय बंद, विद्यार्थी प्रातर्विधीसाठी जातात बाहेर; वीज फिटींगही उखडली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय व खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. जिल्ह्यातील बऱ्याचशा आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
अहेरी प्रकल्पांतर्गत गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रशाळेला लोकमत चमूने मंगळवारी भेट दिली. या आश्रमशाळेत सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. मुलांना झोपण्यासाठी पलंग नाही. खाली गाद्यांवर विद्यार्थी झोपतात, असे दिसून आले. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अनेक आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. ती अवस्था यंदाही कायमच असल्याचे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना अजुनही नोटबूक देण्यात आले नाही, क्रीडा साहित्यही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. सोलर वाटर हिटर शासकीय आश्रमशाळांमध्ये बसविण्यात आले आहे. मात्र बसविल्यापासून याचा कोणताही उपयोग विद्यार्थ्यांना झालेला नाही. ते धूळखात पडून आहे. नळाची व्यवस्था आहे. परंतु पाईपलाईन लिकेज असल्याने नळ बंद आहे, असे चित्र गुड्डीगुडम येथे दिसून आले. मुलांना शर्ट देण्यात आले आहे. मात्र पँट मिळालेला नाही. स्वयंपाक बनविण्यासाठी गॅस नाही. त्यामुळे लाकड वापरून चुलीवरच स्वयंपाक शिजविला जातो. मुलचेरा येथेही शासकीय आश्रमशाळेत सोलर वाटर हिटर धूळखात पडून असल्याचे दिसून आले.

४गुड्डीगुडम आश्रमशाळेच्या शौचालयाची साफसफाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालय बंद आहे. पाणी नसल्याने शौचालय बंद करून आहे. त्यामुळे विद्यार्थी उघड्यावर शौचाला जातात. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला जात असताना आश्रमशाळांचे विद्यार्थी उघड्यावर शौचाला पाठविण्याचे पुण्यकर्म आदिवासी विकास विभाग करीत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो. आश्रमशाळांना जनरेटर देण्यात आले आहे. मात्र ते बंद अवस्थेत आहे. येथील समस्येबाबत मुख्याध्यापकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. मात्र मुख्याध्यापक शाळेत हजर नव्हते व त्यांचा संपर्क नंबरवरही प्रतिसाद मिळत नव्हता. इतर कर्मचारी काहीही सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांची बाजू घेता आली नाही.

जिमलगट्टा शाळेत वीज फिटींग उखडून गेली
४जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली असता, येथे पाच ते सात वर्ग खोल्या पावसाळ्यात गळत असल्याचे दिसून आले. विजेची फिटींगही वर्गखोल्यांमध्ये करण्यात आलेली नाही. केवळ अकरावी व बारावीच्या वर्गातच वीज फिटींग करण्यात आली नाही. तेही वायर पूर्णत: तुटलेले आहे. इतर वर्गात सर्वत्र अंधार आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाले नाही
४जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांना अजुनपर्यंत इंग्रजी, भूगोल, मराठी विषयाचे शिक्षक मिळालेले नाही. दोन माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत इंग्रजी विषय शिकवायला सुरूवात झाली नाही. निवासी विद्यार्थ्यांना सकाळी अंडी व केळीचा अजुनही पुरवठा झालेला नाही. शाळेला नवीन इमारत देण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाले नाही. परंतु याकडेही दुर्लक्ष आहे.

सोडे आश्रमशाळेतही अडचणी
धानोरा तालुक्याच्या सोडे येथे १९७८ मध्ये आश्रमशाळा बांधण्यात आली. निवसस्थानातून सध्या पाणी गळती होत आहे. शौचालय व बाथरूमचे दरवाजे तुटलेले आहे. तीन वर्षापासून जनरेटर बंद अवस्थेत आहे. खिडक्यांचे तावदान फुटले आहे.

जिमलगट्टा शाळेतील शौचालय चोकअप झालेले आहे. बाथरूमची दुरावस्था असल्याने विद्यार्थी शाळेच्या आवारात असलेल्या विहिरीवर किंवा नदीवर आंघोळीसाठी जातात. तसेच शौचासाठी गावाबाहेर जातात, असे दिसून आले. मुलींसाठी शौचालय आहे. मात्र पाण्याची सोय तेथे नाही. त्यामुळे त्यांनाही प्रांत विधीसाठी बाहेरच जावे लागते.

अकरावी व बारावीसाठी दोनच प्राध्यापक
४अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ दोनच प्राध्यापक आहे. इंग्रजी विषय शिकविलाच जात नाही. पूर्ण विषयाचे पुस्तक व नोटबूकही देण्यात आलेले नाही, अशी माहिती येथे मिळाली. सध्या ही शाळा भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरी यांच्या मार्फत चालविली जात आहे. ४८० विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेत आहे.

जिमलगट्टा शाळेत टाकीचे बांधकाम लिकेज
जिमलगट्टा शाळेत पाण्याची सोय व्हावी म्हणून टाकी बनविण्यात आली. परंतु टाकी लिकेज आहे. त्यामुळे पाईपलाईन टाकण्यात आली नाही. शाळेत सौर वाटर हिटर लावण्यात आले. परंतु त्याचा काहीही उपयोग नाही. ते धूळखात पडून आहे. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग नसल्याने खाली गादी टाकून झोपावे लागते. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पुरेशी सोय नाही.

शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळेच्या दुरूस्तीसाठी व शौचालय, बाथरूमच्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे पाठविण्यात आला. पाणी टाकी बनवून पाईपलाईनचे काम अर्धवट झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, ती सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
- ए. डब्ल्यू. हेमने, मुख्याध्यापक,
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जिमलगट्टा

बेसीक गरजांची पूर्तता करण्यासाठी निधी मिळणार
शासकीय आश्रमशाळांमध्ये ज्या अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रूपये निधी दिला जाणार आहे. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून प्राधान्य क्रमाने या निधीतून अडचणी असणारे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच शाळांच्या खोल्यांमध्ये विद्युतीकरण कामासाठीही निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठविण्यात आला आहे. त्यात निधी उपलब्ध झाल्यावर विद्युतीकरणाचे कामही पूर्ण केले जातील. राज्यस्तरावरून आश्रमशाळांना सोलर वाटर हिटर पुरविण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. त्यामुळे वाटर हिटर बंद अवस्थेत आहे. तसेच नाशिक येथून आश्रमशाळांमध्ये प्राध्यापक व शिक्षक यांच्या भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यानंतर आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व प्राध्यापक प्रत्येक विषयासाठी उपलब्ध होतील. - पी. डी. लाटकर, सहायक प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी

Web Title: Ashramshala in the midst of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.