आष्टी-चंद्रपूर मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:55 AM2018-10-29T00:55:04+5:302018-10-29T00:57:40+5:30
पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अतिशय बकाल अवस्था झाल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.
आष्टी येथील आंबेडकर चौकामध्ये चामोर्शी मार्गावर गेल्या चार महिन्यांपासून मोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र अद्यापही हे खड्डे बुजविण्यात आले नाही. याच मार्गावर हॉटेल, चहाटपरी असल्याने वाहनधारकांची मोठी गर्दी असते. शिवाय याच मार्गावर बसथांबा असल्याने प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी दिवसभर मोठे ट्रेलर, बसेस आवागमन करीत असतात. परिणामी मोठे वाहन आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संबंधित विभागाने रस्त्यालगतच्या दुकानदारास नोटीस बजावावी, रस्त्यावरील गिट्टी उचलण्यास सांगावी, अशी मागणी होत आहे. सदर मार्गावर शुभम हॉटेलजवळ रस्ता एका बाजूने दबलेला आहे. त्यामुळे वाहने सांभाळूनच चालवावी लागत आहे. वैनगंगा नदीवर पूर्ण रोडवर अर्धा ते एक किमी फूट अंतराचे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ते अद्यापही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित अपघाताचा मुहूर्त तर शोधत नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.