रिक्त पदांनी आष्टीचे रुग्णालय आजारी
By admin | Published: May 19, 2016 01:13 AM2016-05-19T01:13:29+5:302016-05-19T01:13:29+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील जवळपास ३५ ते ४० नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले.
डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची १२ पदे रिक्त : ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील जवळपास ३५ ते ४० नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. मात्र या रूग्णालयात वर्ग १ चे वैद्यकीय अधीक्षक, वर्ग २ चे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण १२ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत डॉ. व कर्मचारी रूग्णसंख्येच्या तुलनेत सेवेसाठी कमी पडत आहेत. परिणामी आष्टी ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा प्रचंड अस्थिपंजर झाली असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी भागात आरोग्याच्या शासकीय सुविधा नाहीत. शिवाय खासगी आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. त्यामुळे आष्टी भागातील ३५ ते ४० हजार नागरिक आरोग्य सुविधेसाठी याच रूग्णालयात येतात. मात्र या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे येथे आलेल्या रूग्णांवर वेळेवर पुरेसा औषधोपचा होत नाही. परिणामी येथे आलेल्या अनेक रूग्णांना चामोर्शी, तसेच गडचिरोलीचे जिल्हा सामान्य रूग्णालय गाठावे लागते. यामुळे बहुतांश रूग्णांवर प्रवासापोटी आर्थिक भुर्दंड बसतो.
आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची एक, डॉक्टरांची दोन, औषध निर्माण अधिकारी एक, क्ष-किरण तंत्रज्ञ एक, सहायक अधीक्षक एक, कनिष्ठ लिपीक दोन, कक्ष सेवक तीन, सफाई कामगार एक अशी एकूण १२ पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. रिक्त पदासंदर्भात अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यात. मात्र जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने येथे रिक्त पदे भरण्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आष्टी भागातील नागरिकांनी आरोग्य विभागाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला आहे. राज्य शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्यकडे लक्ष देऊन आष्टीच्या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयासारखीच जिल्हाभरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची स्थिती आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवाही रिक्तपदांमुळे कोलमडली आहे. (प्रतिनिधी)