आष्टी पोलिसांनी आवळल्या दारू तस्कराच्या मुसक्या; दारूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By दिगांबर जवादे | Published: August 22, 2023 03:47 PM2023-08-22T15:47:38+5:302023-08-22T15:49:30+5:30
आष्टी-आल्लापल्ली मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ रचला सापळा
गडचिरोली : गाोपनीय माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी आलापल्ली मार्गावर सापळा रचून सुमारे दोन लाख रुपयांची दारू व चार लाख रुपये किमतीची कार असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातून दारू आणली जाते. आष्टीजवळील पुलावरून चारचाकी वाहनाने दारूची जिल्ह्याच्या विविध भागात तस्करी केली जाते. त्यामुळे आष्टी पोलिसांना नेहमी सावध राहावे लागते.
एमएच ०२ सीडी ७४३१ क्रमांकाच्या कारने आष्टीमार्गे दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांनी आष्टी- आल्लापल्ली मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला. कारला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी, विदेशी दारूचे २० बॉक्स आढळून आले. त्याची किंमत दोन लाख रुपये आहे. तसेच दारूची वाहतूक करणारी कारही जप्त करण्यात आली. कारची किंमत चार लाख रुपये आहे. असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सूरज मंगेश भोयर (२५) रा. सोनुर्ली जि. चंद्रपूर याला अटक केली.