आष्टी, अहेरीत वादळाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:51 AM2017-09-07T00:51:51+5:302017-09-07T00:52:09+5:30
बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळाने आष्टी, अहेरी व आलापल्ली भागात कहर माजविला. वादळी पावसाने आष्टी-आलापल्ली मार्गावरील वन विभागाच्या चौकीजवळ रस्त्यालगतची मोठी झाडे कोसळल्याने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी/अहेरी : बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळाने आष्टी, अहेरी व आलापल्ली भागात कहर माजविला. वादळी पावसाने आष्टी-आलापल्ली मार्गावरील वन विभागाच्या चौकीजवळ रस्त्यालगतची मोठी झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. याशिवाय आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील झाडांवर वीज कोसळली. मात्र यात कुठलीही हानी झाली नाही.
वादळी पावसाने आष्ट-आलापल्ली मार्गावरील वन विभागाच्या चौकीजवळ रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे पडली. त्यामुळे दोन्ही बाजूने जवळपास एक तास वाहतूक खोळंबली.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रसंगी जि.प. सदस्य रूपाली पंदीलवार व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. चंद्रपूर-आलापल्ली मार्गावर मार्र्कंडा (कं.) व आष्टी गावाच्या दरम्यान मोठे झाड कोसळल्याने वाहतूक तासभर ठप्प होती.
शाळा परिसरातील झाडांवर वीज कोसळली
आष्टी येथे विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर वीज पडली. त्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. शाळा सुरू असताना विद्यार्थी वर्गखोलीत असल्याने यात कुठलीही हानी झाली नाही. मात्र विजेच्या धक्क्याने वर्गखोलीतील विद्यार्थी खाली पडले. कुणालाही इजा झाली नाही.