निधीअभावी विजयनगर पोचमार्गाचे डांबरीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:36 AM2021-04-11T04:36:16+5:302021-04-11T04:36:16+5:30
कोपरअल्ली ते रेंगेवाही रस्त्यादरम्यान विजयनगर पोचमार्ग काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करून सहा किलोमीटर ...
कोपरअल्ली ते रेंगेवाही रस्त्यादरम्यान विजयनगर पोचमार्ग काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करून सहा किलोमीटर अंतर डांबरीकरण करावयाचे होते. मागील सरकारच्या कार्यकाळात सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र सरकार बदलताच निधी नसल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे काम अर्धवट ठेवून बंद करण्यात आले. या रस्त्याचे कंत्राट गोंदिया येथील एम. एस. वालिया अँड ब्रदर्स या कंपनीला मिळाले होते. खडीकरण करून पुढील काम बंद केल्याने दोन कि.मी. अंतरावरील गिट्टी पूर्णत: उखडली आहे. मूलचेरा येथे विविध कामासाठी येणाऱ्या अडपल्ली, कालीनगर, गांधीनगर, लक्ष्मीपूर, विजयनगर येथील नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून त्रास सहन लागत आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी चालकांना जंगलातून वाट शोधावी लागते. संबधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.