निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा

By संजय तिपाले | Published: October 21, 2024 06:35 PM2024-10-21T18:35:28+5:302024-10-21T18:36:50+5:30

Gadchiroli : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक: एक जवान जखमी, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Assassination plot before the election, five Naxals killed | निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा

Assassination plot before the election, five Naxals killed

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात येथील पोलिसांना २१ ऑक्टोबरला यश आले. माओवादी व जवानांत छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात जोरदार चकमक उडाली. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे नक्षल्यांना जबर हादरा बसला आहे. अनेक जहाल माओवादी चकमकीत ठार झाले तर काहींनी शरणागती पत्करली. त्यामुळे माओवादी चळवळ खिळखिळी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये २१ ऑक्टोबरला पहाटे चकमक सुरु झाली. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.

यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह देखील गडचिरोली येथे आणले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

घनदाट जंगलाच्या आश्रयाने घुसखोरी
माओवाद्यांविरुध्द महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांनीही आक्रमकपणे मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षली सैरभैर झाले आहेत. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या काहींना अटक झाली तर काही मयत झाले. त्यामुळे ही चळवळ आता नेतृत्वहीन होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

'सर्च ऑपरेशन' सुरुच
दरम्यान, कोपरी जंगलात पहाटे सहा वाजेपासून जवान व नक्षल्यांत चकमक सुरु झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही चकमक सुरुच होती. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात झडती घेतल्यानंतर आतापर्यंत पाच नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यात मृत नक्षल्यांची संख्या वाढू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोठा फौजफाटा तैनात
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर अधीक्षक यतीश देशमुख , एम .रमेश यांच्या नेतृत्वात सी -६० पथकाच्या २२ तुकड्या व सीआरपीएफ च्या शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या या कोपर्शी जंगलात पाठविण्यात आल्या. जंगलात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Web Title: Assassination plot before the election, five Naxals killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.