विधानसभा अधिवेशनासाठी जिल्ह्याचे ६६ प्रश्न पाठविले
By admin | Published: July 17, 2016 01:05 AM2016-07-17T01:05:47+5:302016-07-17T01:05:47+5:30
१८ जुलै सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, आॅनलाईन नोंदणी केली आहे.
देवराव होळी यांची माहिती : सिंचनाचा मुद्दा प्राधान्याने मांडणार
गडचिरोली : १८ जुलै सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यात सिंचन, ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ.डॉ.होळी यांनी सांगितले की, ६६ प्रश्नांमध्ये ४१ तारांकित, २० लक्षवेधी व अर्धा तास चर्चेतील ५ प्रश्नांचा समावेश आहे. ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, वनकायदा शिथिल करुन किमान १० हजार हेक्टर वनजमीन सिंचन प्रकल्पांसाठी द्यावी, बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र व मालमत्ता कार्ड द्यावे, झाडे-झाडीया समाजाला कोणत्याही एका प्रवर्गात समाविष्ट करावे, पेसा कायद्यात सुधारणा करावी, खास बाब म्हणून गडचिरोलीतील महिला रुग्णालयासाठी तत्काळ पदे मंजूर करावीत इत्यादी प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार आहोत, असे आ.डॉ.होळी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, प्रकाश अर्जुनवार, गोवर्धन चव्हाण, नंदू काबरा, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, सलिम बुधवानी, डॉ.भारत खटी, विनोद देवोजवार, अनिल कुनघाडकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)