लसीच्या जनजागृतीसाठी सहायक जिल्हाधिकारी पोहोचले दुर्गम गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:47+5:302021-06-06T04:27:47+5:30
धानोरा : कोरोनाच्या लसीकरणाबाबत तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी ...
धानोरा : कोरोनाच्या लसीकरणाबाबत तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी अतिदुर्गम पेंढरी परिसरातील मोहगाव येथे सभा घेऊन जनजागृती केली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लसीकरण हा एकच उपाय असल्याचे सांगत त्यांनी गावकऱ्यांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले.
येरेकर यांनी मोहगाव येथे त्या परिसरातील १५ गावांतील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव यांची संयुक्त सभा घेतली. लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजामुळे आणि पसरलेल्या अफवांमुळे ग्रामीण नागरिकांमध्ये लसीबाबत शंका आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला लसीकरणासाठी काही गावांमधून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने गावांपर्यंत पोहोचून ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत जागृती आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या सभेमध्ये लसीकरणाबाबत मनात असलेले गैरसमज, शंका यांचे निरसन करण्यात आले. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल, तर सर्व नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन एसडीओ येरेकर यांनी केले.
यावेळी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, ग्रामसभांचे मार्गदर्शक देवाजी तोफा, धानोरा नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. या सभेला डॉ. हिचामी, डॉ. बोगा, ग्रामसभा अध्यक्ष देवसाय आतला, बावसू पावे, श्रीनिवास दुलमवार, मोहगावचे उपसरपंच दिनेश टेकाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन ग्रामसेवक जयंत मेश्राम यांनी केले.