सहायक अधीक्षकास अटक
By admin | Published: March 30, 2017 01:51 AM2017-03-30T01:51:02+5:302017-03-30T01:51:02+5:30
वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्यासाठी शिफारसीकरिता अधिपरिचारिकेकडून ७ हजार रूपयांची लाच घेताना
चामोर्शी : वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्यासाठी शिफारसीकरिता अधिपरिचारिकेकडून ७ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक कैलास चतुरदास आजापुंजे (५४) यांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहात पकडले.
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या. कर्तव्यावर रूजू होण्यासाठी त्यांनी रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक कैलास आजापुंजे यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला. वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्याच्या शिफारसीसाठी सहायक अधीक्षक आजापुंजे यांनी अधिपरिचारिकेला १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान संबंधित अधिपरिचारिकाने गडचिरोलीच्या एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा रचला. यावेळी आजापुंजे यांनी अधिपरिचारिकेकडून तडजोडीअंती सात हजार रूपयांची लाच स्वीकारली. यावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याचे विरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरीक्षक महादेव टेकाम, पोलीस हवालदार विठोबा साखरे, पोलीस शिपाई रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडीकेवार, मिलींद गेडाम, गणेश वासेकर व घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.