माहोल गरम आहे, पाच दिवस थांबा; नंतर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:16 AM2019-07-21T00:16:30+5:302019-07-21T00:16:51+5:30

‘आरमोरी शहरात अवैध ७० दारू विक्रेत्यांचा ठिय्या’ अशा मथळ्याखाली लोकमतमध्ये गुरूवारी बातमी झळकताच शहरातील त्या दारू विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शिवाय दारू विक्रेत्यांना आतून सहकार्य करणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

The atmosphere is hot, wait for five days; Start later | माहोल गरम आहे, पाच दिवस थांबा; नंतर सुरू करा

माहोल गरम आहे, पाच दिवस थांबा; नंतर सुरू करा

Next
ठळक मुद्देकारवाई शून्य। आरमोरीतील काही पोलिसांचा दारू विक्रेत्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : ‘आरमोरी शहरात अवैध ७० दारू विक्रेत्यांचा ठिय्या’ अशा मथळ्याखाली लोकमतमध्ये गुरूवारी बातमी झळकताच शहरातील त्या दारू विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शिवाय दारू विक्रेत्यांना आतून सहकार्य करणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर सध्या माहोल गरम आहे. पाच दिवस थांबा व त्यानंतर दारू विक्रीस सुरू करा, असा सल्ला दारू विक्रेत्यांशी जवळचे संबंध असलेले आरमोरीतील काही पोलीस देत असल्याची खमंग चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे.
आरमोरी शहरातील अवैध दारू विक्री संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून पोलीस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कारवाई दिसून येत नसल्याने पोलिसांमधील संवेदनशीलता संपली काय? असा सवालही काही सुज्ञ नागरिक करीत आहेत.
तीन दिवसापूर्वी आरमोरी शहराच्या वार्डावार्डात देशी, विदेशी, मोहफूल दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. लोकमतमध्ये गुरूवारी बातमी झळकताच दारू विक्रेते सतर्क झाले. खास ओळखीतील मद्यपींना अतिशय गोपनिय पध्दतीने दारूचा आतून पुरवठा सुरू आहे. दारू विक्रीमुळे आरमोरी शहरात दिवसाढवळ्या तसेच रात्री बेरात्री भांडण व तंट्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शहरातील सामाजिक सलोखा व शांतता धोक्यात आला आहे. त्यामुळे शहरातील दारू विक्रीवर रोख लावण्याची आग्रही मागणी महिलांकडून होत आहे.
‘त्या’ पोलिसांच्या बदल्या करा
आरमोरी पोलीस ठाण्यातील ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे दारू विक्रेत्यांशी अतिशय घनिष्ट संबंध आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांची गोपनिय चौकशी करून त्यांची आरमोरी पोलीस ठाण्यातून इतरत्र बदली करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात बडे दारू विक्रेते असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. चिल्लर विक्रेत्यांना टार्गेट केले जाते. याची दखल पोलीस अधीक्षकांनी घ्यावी, अशी मागणी आरमोरीकरांनी केली आहे.

Web Title: The atmosphere is hot, wait for five days; Start later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.