मदतीसाठी एटापल्लीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:30 AM2019-01-17T01:30:25+5:302019-01-17T01:31:17+5:30
सूरजागडचे काम बंद करा, अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्यात यावे, या मागणीसाठी एटापल्लीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : सूरजागडचे काम बंद करा, अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्यात यावे, या मागणीसाठी एटापल्लीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली.
एटापल्लीत सकाळपासून सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता वनपाल प्रकाश अबांदे यांचे प्रेत वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ आदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मृत इसमाच्या कुटुंबियाला ५० लाख रुपये देण्यात यावे, सूरजागडचे काम बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. दिवसभर चक्काजाम करून वाहतूक बंद पाडण्यात आली. रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी व मोठा पोलीस बंदोबस्त होता. या आंदोलनात युवक, व्यापारी, सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी तहसीलदार व बीडीओंनी भेट दिल. वृत्त लिहपर्यत वनपालाचा प्रेत आंदोलन स्थळीच होता. पोलीस संरक्षणात सूरजागड पहाडीवरून लोहदगडाची वाहतूक सुरू असून ट्रकचालक दारूपिऊन ट्रक चालवित असल्याचे समजते.
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सूरजागड लोहखनिज वाहतुकीचा मार्ग चौपदरी करा अन्यथा लोहप्रकल्प स्थानिक ठिकाणीच उभारावा, अशी भूमिका घेत नागरिकांची होत असलेल्या अडचण व त्रासाबाबत प्रशासनाने तोडगा काढण्याचे आवाहन केले.
एसटी महामंडळ देणार १० लाखांची मदत
अपघातात मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांना राज्य परिवहन महामंडळाकडून १० लाख रूपयांची मदत मिळणार असल्याची माहिती उपविभगीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिली. लॉयड मेटल कंपनीकडूनही मृताच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.