नवीन सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 08:29 PM2022-10-27T20:29:53+5:302022-10-27T20:30:18+5:30
Gadchiroli News सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.
गडचिराेली : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत तसेच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा एनसीआरबीचा रिपाेर्ट आहे. या दाेन्ही सरकारच्या काळात महिला असुरक्षित झाल्या, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.
घाेट परिसरातील काेठरी बुद्धविहारात वर्षावास समापन साेहळ्याच्या निमित्ताने प्रा. कवाडे गुरुवारी गडचिराेलीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. सर्वधर्म समभावाचे तत्त्व पाळणाऱ्या महाराष्ट्रात, तसेच देशात सध्या केवळ सत्तेसाठी राजकारण केल्या जात आहे, असा आराेप प्रा. कवाडे यांनी केला.
आगामी काळात आमचा पीरिपा पक्ष काेणत्या पक्षासाेबत आघाडी करणार, काेणत्या पक्षासाेबत जायचे, याबाबतचा निर्णय ११ नाेव्हेंबरपर्यंत पक्षाची काेअर कमिटी घेणार आहे, असे प्रा. कवाडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बाेरकर, महासचिव भूषण सहारे, प्रमाेद खाेब्रागडे, दिलीप पाटील, ॲड. विनाेद बांबाेळे आदी उपस्थित हाेते.
संविधान हाच धर्म
भारतीय चलनी नाेटांवर महात्मा गांधीजींचा फाेटाे आहे. त्या नाेटांवर माता लक्ष्मी व गणेशजी यांचे फाेटाे प्रकाशित करावे, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले. या वक्तव्याने सर्वधर्म समभावाच्या तत्त्वाला मूठमाती दिल्यासारखे हाेईल. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. सरकार व देशाला काेणताही धर्म नाही. देश आणि सरकारसाठी संविधान हाच धर्म आहे, असे सांगत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या वक्तव्याचा आपण निषेध करताे, असे प्रा. कवाडे यावेळी म्हणाले.
सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच व्हावा
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच झाला पाहिजे, जेणेकरून स्थानिक बेराेजगारांना राेजगार मिळेल, अशी भूमिका प्रा. कवाडे यांनी यावेळी मांडली. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन उद्याेग उभारणीसाठी आपण पाठपुरावा करणार, असेही ते म्हणाले.