पत्रकारावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: July 10, 2017 12:35 AM2017-07-10T00:35:29+5:302017-07-10T00:35:29+5:30
एका प्रादेशिक वृत्तपत्राचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर ८ जुलै रोजी शनिवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी ...
कुरूड फाट्यावरील घटना : जखमी मेश्रामवर उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : एका प्रादेशिक वृत्तपत्राचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर ८ जुलै रोजी शनिवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी देसाईगंजनजीकच्या कुरूड फाट्यावर अंधाराचा फायदा घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे जिल्हाभरातील पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
देसाईगंजवरून वृत्त संकलन करून किशोर मेश्राम हे आपल्या स्वगावी कुरूड येथे दुचाकीने जात होते. दरम्यान देसाईगंजपासून अज्ञात दोन इसम मेश्राम यांचा पाठलाग करीत होते. कुरूड फाट्यावर या हल्लेखोरांनी मेश्राम यांची दुचाकी अडवून त्यांच्या दोन्ही पायावर रॉडने हल्ला केला. यामध्ये किशोर मेश्राम यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनास्थळावर देसाईगंजचे प्रभारी पोलीस अधिकारी अतुल तवाडे यांनी भेट दिली. पोलीस तपास करीत आहे.
पत्रकार संरक्षण कायदा कागदावरच
यापूर्वी कोरची येथील पत्रकार राष्ट्रपाल नखाते यांच्यावर २७ एप्रिल २०१७ रोजी हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांनी नवीन पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही अटक झाली नाही. त्यामुळे हा नवा कायदा कागदावर आहे.