वाघिणीच्या अधिवासात गेल्याने हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:43 AM2017-09-07T00:43:03+5:302017-09-07T00:43:24+5:30
५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात ....
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात गेल्याने घडल्या, असा प्रमाणभूत निष्कर्ष राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या सदस्यांनी काढला आहे.
सदर घटनेतील कोंढाळा येथील मृत व्यक्ती हा मोहफूल गोळा करण्यासाठी सदर वाघीनीच्या अधिवासात गेला होता. तर दुसºया घटनेतील रवी गावातील एका शेतात उन्हाळी धान लावल्याने हा भाग एखाद्या गवती रमण्याप्रमाणे होता. शेतात मोटारपंप लावल्याने शेतात मुबलक पाणी होता. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत नष्ट होत असतात. तसेच हिरवळ वाढत नसल्याने अन्य प्राण्यांच्या पाण्याच्या हिरवळीच्या ठिकाणी वाघीनीचे वास्तव असते. त्यामुळे वाघासारख्या प्राण्याला मानवी चाहूल लागली तर आपल्याला धोका आहे, असे समजून भीतीपोटी वाघासारखे प्राणी मानवावर हल्ला करतात. मांजर वंशातील हे वन्यजीव हिंस्त्र असले तरी तेवढेच भितरे असतात. म्हणूनच या दोन्ही घटना आणि जनावरे ठार केल्याच्या घटना अशाच प्रकारातून घडल्या आहेत. त्यामुळे ती वाघीन नरभक्षक ठरविणे योग्य नसून हल्लेखोर होती, असा समितीचा निष्कर्ष अहवालात नमूद आहे.
या मादी वाघीनीला १२ आॅगस्ट रोजी आरमोरी तालुक्याच्या रवी गावाजवळ बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. परिस्थिती तपासून सदर वाघीनीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे ठेवण्यात आले. तांत्रिक समितीने सर्व घटना व परिस्थिती तपासून सदर वाघीनीस सुरक्षित अधिवासात मुक्त करण्याच्या केलेल्या शिफारशिस राज्यस्तरीय समितीने सहमती दर्शविली आहे. जंगलव्याप्त क्षेत्र ही वन्यजीवाची निवासस्थाने असतात. जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट झाली तर वन्यप्राणी मोकळ्या जागेत येतात. मानवाकडून त्यांचे निवारा व निवासस्थान हिसकविल्याने नाईलाजास्तव वन्यजीवांचे मानवावरील हल्ले वाढतात, अशीही तरतूद राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या अहवालात नमूद आहे. यापूर्वीही वन्यप्राण्यांचे निवासस्थान असलेल्या क्षेत्रात मानवाचे अधिवास वाढल्याने मानवावर हल्ले झाले आहेत.
जनता व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा- तांबटकर
एखाद्या जंगलव्याप्त क्षेत्रात तडस, बिबट्या, वाघ या वन्यजीवांची चाहूल लागली तरी गैरसमजापोटी नागरिकांमध्ये विनाकरण भीतीचे वातावरण निर्माण होत असते. यावर कोणतीही शहानीशा न करून प्रसारमाध्यमांमार्फत त्याचे अवडंबर माजविले जाते. धोकादायक स्थिती असली तरी वनविभाग त्याची पूर्णत: दखल घेत असते. वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित करताना पत्रकार व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी केले आहे.