गोंडवाना विद्यापीठाला २२ विभाग मिळवून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:20 AM2018-07-21T00:20:02+5:302018-07-21T00:21:22+5:30
गोंडवाना विद्यापीठाबद्दल कोण काय बोलते याला फारसे महत्व न देता विद्यापीठ आपले काम करीत आहे. या विद्यापीठाला नागपूर विद्यापीठाएवढे २२ विभाग मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाबद्दल कोण काय बोलते याला फारसे महत्व न देता विद्यापीठ आपले काम करीत आहे. या विद्यापीठाला नागपूर विद्यापीठाएवढे २२ विभाग मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात पाचवे कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळत असलेले डॉ.कल्याणकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या कुलगुरूंमध्ये ते सर्वाधिक काळ कुलगुरूपद सांभाळणारे ठरले आहेत. अजून दोन वर्षपर्यंत त्यांना आपल्या कामाची छाप पाडण्यासाठी मिळणार आहेत.
आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विद्यापीठासाठी झालेली कामे आणि भविष्यातील योजनांबाबत डॉ.कल्याणकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठात आतापर्यंत केवळ ५ पदव्युत्तर अभ्यासक्रम होते. यावर्षी आणखी ५ अभ्यासक्रमांची भर त्यात पडली आहे. त्यात मराठी, अप्लाईड एकॉनॉमिक्स, संगणक विज्ञान, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. विद्यापीठात किमान २२ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे यावेळी डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कॉम्प्लेक्स परिसरातील कॅम्पसमध्ये १०० खाटांचे मुलांचे आणि १०० खाटांचे मुलींचे वसतिगृह तयार झाले आहे. याशिवाय अतिथीगृह आणि कुलगुरू निवासही तयार झाले. पुढील आठवड्यात सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याशिवाय २६ कोटी रुपयातून परीक्षा भवनाची उभारणी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
विद्यापीठाचा सध्याचा परिसर १० एकरचा आहे. मात्र ही जागा अपुरी आहे. त्यामुळे आरमोरी मार्गावर १९२ एकर जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत सर्व जमिनीची खरेदी पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या कॅम्पसमुळे अडचणी येणार नाहीत का? या प्रश्नावर कुलगुरूंनी थोडी गैरसोय होईल तरी त्याला नाईलाज असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी आज विद्यापीठाचा कॅम्पस आहे त्या परिसरात जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे आरमोरी मार्गावर जावे लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कौशल्य विकासावर भर देणार
या जिल्ह्यात जे-जे व्यवसाय करणे शक्य आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजित आहे. त्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे सहकार्य घेतले जाणार आहे. ज्या महाविद्यालयांची क्षमता आहे त्या महाविद्यालयांमध्ये हे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता दिली जाणार आहे. आदिवासी अध्यासन सुरू करण्याबाबतही भविष्यात निश्चितपणे विचार केला जाईल, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.