देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:11 IST2018-10-29T22:10:42+5:302018-10-29T22:11:13+5:30
देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या कोणाला ती शासकीय जागा हडपण्यास मदत करण्यासाठी आम्हाला तेथून हटविण्यात आले असून आम्हाला हक्काचा निवारा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेघर कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनी परिसरात महसूल व वनविभागाची काही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे. ती जागा हडपण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या जागेत बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान आतापर्यंत कुठेतरी आडोशाने राहणाºया गोरगरीब २५ कुटुंबांनी या शासकीय जागेत (सर्व्हे नं.४३२) काही दिवसांपूर्वी आश्रय घेतला. मात्र दि.२२ आॅक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्यांनी काहीही सूचना न करता त्यांच्या काठ्यांनी मारणे सुरू केले. आमचा गुन्हा काय, अशी विचारणा केली असता ते काहीही ऐकायला तयार नव्हते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यासोबत नगर परिषदेचा कर्मचारी व ट्रॅक्टरसुद्धा झोपडीवाल्यांचे साहित्य नेण्यासाठी होता. त्यामुळे त्या जागेसंदर्भात नगर परिषदेचा संबंध काय? ती जागा नगर परिषदेच्या मालकीची नाही किंवा शासनाने कोणत्या कारणासाठी ती जागा कोणाला दिलेली नाही. मग असे असताना आम्हाला हटविण्यात नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज काय? असा सवाल तक्रारकर्त्यांनी केला आहे.
झोपडीधारकांवरील कारवाई नियमबाह्य
वास्तविक कोणत्याही शासकीय जागेतील अतिक्रमण हटविताना संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतरही ते स्वत:हून हटले नाही जबरीने अतिक्रमण काढता येते. पण सायंकाळी ६ वाजताच्या नंतर राहत्या घराचे अतिक्रमण हटविता येत नाही. असे असताना या प्रकरणात रात्री ११ वाजता कारवाई करून गोरगरीब कुटुंबांना बेघर कसे केले? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विमल बोरडे, पुष्पा रामटेके, राणी बन्सोड, शालू मेश्राम, विणा मेश्राम, तारा मडावी, विमल कनोजिया, कल्पना भोयर, सुशिला गजभिये, अन्वरी अंसारी, कनिजा शेख आदी अनेक महिला व पुरूषांनी केली आहे.