अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहोचविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 05:00 AM2022-06-26T05:00:00+5:302022-06-26T05:00:22+5:30
तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये १०० रुपयांच्या ९९५ नोटा आणि २०० रुपयांच्या ९९४ नोटा होत्या. नकली नोटांचा पुरवठा करणारी अकोल्यातील ती व्यक्ती कोण, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील, तर एक आरोपी सिरोंचा येथील आहे. या नकली नोटा गडचिरोली जिल्ह्यात चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता.
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणाच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील बेगलूर गावात राहणाऱ्या सतीश सम्मय्या पोलू या शेती व्यवसाय करणाऱ्या युवकाला झटपट पैसे कमवायचे होते. महाराष्ट्रातील अकोला येथे एका व्यक्तीकडून नकली नोटा मिळतात अशी माहिती त्याला मिळाली होती. त्या नोटा आणून सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागात त्या चलनात आणल्या जाऊ शकतात, असा त्याला विश्वास होता. त्यासाठी सतीश याने त्याच्याच गावातील सुरेश मल्ल्या एलुकुची याला सोबत घेऊन सिरोंचा येथील जयंत मांडवे याच्याशी संपर्क केला. मांडवे यालाही ही कल्पना आवडली.
ठरल्यानुसार हे तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये १०० रुपयांच्या ९९५ नोटा आणि २०० रुपयांच्या ९९४ नोटा होत्या. नकली नोटांचा पुरवठा करणारी अकोल्यातील ती व्यक्ती कोण, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
१७०० च्या नकली नोटा मार्गातच चालविल्या
अकोला येथून ३ लाख रुपयांच्या नकली नोटा घेतल्यानंतर तीनही आरोपी सिरोंचाच्या दिशेने निघाले. मार्गात त्यांनी त्या नकली नोटांमधूनच १७०० रुपये वापरून व्यवहारही केले. त्या नोटा सहजपणे चालल्याचे पाहून त्यांना नोटा कोणाला ओळखू येणार नाही, याबद्दल विश्वास निर्माण झाला.
अन् नकली नोटांचे बिंग फुटले
३ लाखांपैकी १७०० रुपये खर्च झाल्यानंतर उर्वरित २ लाख ९८ हजार ३०० रुपयांच्या नकली नोटा घेऊन आरोपी तेलंगणातील आपल्या गावी बेगलूर येथे येणार होते. दोन दिवस गावात आराम केल्यानंतर या नोटा हळूहळू सिरोंचा तालुक्यात नेऊन चलनात आणू असा त्यांचा डाव होता; पण बेगलूर येथे पोहोचण्याआधीच कुडूरुपल्ली क्रॉस रोडवर महादेवपूर पोलिसांनी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता नोटांच्या बंडलचे कव्हर पोलिसांना दिसते. त्यामुळे सखोल तपासणीत ते पैसे नकली असल्याचे आढळले.