भयंकर! घराला कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; वेळीच जाग आल्याने वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 08:27 PM2022-01-29T20:27:36+5:302022-01-29T20:30:25+5:30
Gadchiroli News गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात करण्यात आला. मात्र वेळीच सावध झाल्याने घरातील सगळ्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.
गडचिरोली: गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात करण्यात आला. मात्र वेळीच सावध झाल्याने घरातील सगळ्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.
ही घटना शनिवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास काेरची तालुक्यातील काेटगूल येथे घडली.
कोटगूल येथील मुख्य बाजार चौकातील बिंदियाबाई चिमनसिंग हारामी वय ६५ वर्षे यांच्या मालकीच्या घरी मिलिंद टेंभूरकर आपल्या पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते. शनिवारी रात्री टेंभूरकर कुटुंब झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला कुलूप लावले. आग लागल्याचे लक्षात येताच टेंभूरकर कुटुंब जागे झाले. यामुळे जीवितहानी टळली. टेंभूरकर यांनी बाजूच्या भाडेकरूची मदत घेऊन खिडकी तोडून बाहेर निघाले आणि आपले जीव वाचविले. आगीमुळे घरमालकाचे जवळपास अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर भाडेकरू यांचे घरगुती सामानासह सोने-चांदी व मोटारसायकल, रोख पैसे पकडून अंदाजे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
गॅस सिलिंडरचा स्फाेट
आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराची भिंत काेसळली. घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सी.आर. भंडारी व कोटगूल पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी आनंद जाधव, तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.