सेवाभाव निर्मितीसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:42 PM2018-02-19T23:42:03+5:302018-02-19T23:42:17+5:30
अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये व्यवसाय करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी एबीव्हीपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) प्रयत्न करीत आहे,....
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये व्यवसाय करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी एबीव्हीपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) प्रयत्न करीत आहे, अशी माहिती एबीव्हीपीचे प्रांतीय अध्यक्ष विक्रमजीत कलाने यांनी दिली. यावेळी प्रांत उपाध्यक्ष प्रा. धमेंद्र मुनघाटे, नगर महामंत्री साहिल धाईत उपस्थित होते.
गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स विद्यालयात एबीव्हीपीच्या प्रांत कार्यकारीणी सदस्यांचे शिबिर रविवारी व सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला जवळपास ७० सदस्य उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना विश्वजीत कलाने बोलत होते. अखील भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नऊ विषयांवर काम करीत आहे. यामध्ये पहिला व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण करण्याचा आहे. सदर विद्यार्थी कितीही मोठ्या पदावर असला तरी समाजाचे आपल्यावर ऋण आहेत. ते फेडण्यासाठी त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील रोजगाराबाबत जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलात्मक वृत्तीला चालना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. कलागुण विकसीत करण्यासाठी राष्ट्रीय कलामंचची स्थापना करण्यात आली आहे. टेक्नालॉजी फार प्युअर डेव्हलपमेंट अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान गरीब नागरिकांना परवडेल, असे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
चलो गाव की ओर या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात नेऊन तेथील प्रत्यक्ष समस्या त्यांच्या लक्षात आणून दिल्या जाणार आहेत. संगीताबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी वर्धा येथे २६ ते २८ फेब्रुवारी रोजी कवी कालिदास संगीत महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती दिली. गडचिरोली येथील शिबिराला ७० प्रांत कार्यकारीणी सदस्य उपस्थित असल्याची माहिती कलाने यांनी दिली.