पर्यटन विकासासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:40 PM2018-03-25T22:40:06+5:302018-03-25T22:40:06+5:30
निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कमलापूर परिसरात पर्यटनाला वाव असून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
आॅनलाईन लोकमत
कमलापूर : निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कमलापूर परिसरात पर्यटनाला वाव असून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी अहेरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी शुक्रवारी कमलापूरला आकस्मिक भेट दिली. तब्बल ४५ मिनिटे थांबून स्थानिक युवक व गावकरी यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी आले असल्याची माहिती युवकांना कळताच युवकांनी हत्ती कॅम्पकडे धाव घेतली. यादरम्यान हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळ घोषीत करावे, तलावाचे खोलीकरण करावे, पाटांची दुरूस्ती करावी, कमलापूर येथील गुरूदेव आश्रमशाळा शासकीय करण्यात यावी, आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केल्या.
कमलापूर येथील हत्ती कॅम्प संपूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. हत्तींच्या पालन पोषणासाठी या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी व चारा उपलब्ध आहे. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने हत्ती कॅम्पचा विकास केल्यास या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढण्यास वाव आहे. मात्र वन विभाग येथील हत्तींना दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही अत्यंत चुकीची बाब आहे. हत्ती स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न झाल्यास कमलापूरसह परिसरातील नागरिक आंदोलन करतील. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. कमलापूर परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाला चांगला वाव आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचेही आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल व इतर विभागाचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते.
विकासाला गती मिळेल
कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. त्याचबरोबर येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटक व नागरिकांना नेहमीच आकर्षीत करते. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून या भागाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा येथील जनता बाळगूण आहे.