चळवळीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:35 AM2017-11-27T00:35:43+5:302017-11-27T00:36:55+5:30
गेल्या सहा महिन्यांच्या शांततेनंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या नक्षल चळवळीने पोलिसांचा ताण वाढविला आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गेल्या सहा महिन्यांच्या शांततेनंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या नक्षल चळवळीने पोलिसांचा ताण वाढविला आहे. गेल्या आठवडाभरात पोलीस खबºया असल्याच्या संशयातून तीन नागरिकांची हत्या आणि भूसुरूंग स्फोटात एक पोलीस हवालदार शहीद झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आपले लक्ष बड्या नक्षल नेत्यांवर केंद्रित केले आहे. त्यांची माहिती देण्यासाठी पाच नेत्यांवर पावणेदोन कोटी रुपयांची बक्षीसेही जाहीर केली आहेत.
पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर आणि काही अंशी यवतमाळ व भंडारा जिल्ह्यात नक्षल चळवळ सक्रिय असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. मात्र नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यातच आहे. आंध्र प्रदेशातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय झालेली ही चळवळ नंतर पूर्व विदर्भात पसरविण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या नक्षल नेत्यांना जेरबंद केल्यास राज्यातून नक्षल चळवळ मोडीत काढण्यास मदत होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चळवळीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.
या नक्षल नेत्यांसह इतरही नेत्यांवर त्यांच्या नक्षल चळवळीतील हुद्द्याप्रमाणे कमी-जास्त बक्षीस ठेवली आहेत. मात्र वरील प्रमुख पाच नेत्यांना पोलिसांनी आता निशाण्यावर ठेवले आहे. त्यांची माहिती देणाºयास ते जीवंत पकडल्या गेले किंवा जीवानिशी मारले गेले तरी त्यांच्यावर ठेवलेले बक्षीस दिले जाणार असल्याचे गडचिरोली पोलिसांनी जाहीर केले.
गडचिरोलीतील १२ पैकी ६ तालुके अतिसंवेदनशिल आहेत. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात भामरागडजवळील एक भूसुरंग स्फोट आणि धानोरा तालुक्यात काही वाहनांची जाळपोळ वगळता कोणत्याही मोठ्या हिंसक घटना घडू शकल्या नव्हत्या. यावर्षीच्या नक्षल सप्ताहातही कोणत्या हिंसक घटना घडविण्यात नक्षल्यांना यश आले नव्हते. परंतू गेल्या आठवडाभरात पुन्हा हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधिक आक्रमकपणे कारवाया सुरू करण्याच्या मानसिकतेत आहे.
नवीन झोनचा विस्तार नियंत्रित करण्याचे आव्हान
नक्षलवाद्यांनी गोंदिया, मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव या तीन जिल्ह्यांचा मिळून नवीन झोन तयार केला आहे. त्यामुळे भविष्यात त्या भागात नक्षली कारवाया वाढण्याची शक्यता पाहता आताच नक्षल्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करून नक्षली कारवायांना नियंत्रित ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे. त्यादृष्टीनेही पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.
भूपतीवर सर्वाधिक ६० लाखांचे बक्षीस
सध्या सक्रिय असलेल्या बड्या नक्षल नेत्यांपैकी भूपती उर्फ मलोजुला वेणुगोपाल हा आंधप्रदेशातील करीमनगर जिल्ह्याचा मूळचा रहिवासी आहे. त्याच्यावर सर्वाधिक ६० लाख रुपयांचे बक्षीस आहे. दीपक उर्फ मिलींद तेलतुंबडे हा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजूरचा मूळ रहिवासी आहे. गेल्या काही वर्षात सक्रिय असलेल्या महाराष्ट्रीयन नक्षल नेत्यांमध्ये तो एकमेव आहे. अनेक दिवसांपासून तो फरार आहे. त्याच्यावर ५० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
दंडकारण्याची (गडचिरोली जिल्हा) सूत्रं सांभाळणारी नक्षल नेता नर्मदाक्का उर्फ अल्लुरी उषाराणी किरणकुमार ही आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्याची मूळ रहिवासी आहे. तिच्यावर २५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय आंध्रप्रदेशातीलच गुंटूर जिल्ह्याच्या रामगुंडम येथील मूळचा रहिवासी जोगन्ना उर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाखांचे आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या महाडसिंग उर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६ लाखांचे बक्षीस महाराष्टÑ पोलिसांनी ठेवले आहे.