दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:03 AM2019-09-07T00:03:41+5:302019-09-07T00:04:07+5:30

उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Attention to the development of remote areas | दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष

दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष

Next
ठळक मुद्देकुलभट्टीत जनजागरण मेळावा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे दुर्गम भागात मूलभूत सुविधाही पोहोचल्या नव्हत्या. मात्र आता नक्षलवाद्यांचा बिमोड करून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी विकास साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे, एसडीपीओ विक्रांत गायकवाड, धानोराचे ठाणेदार विवेक अहिरे, मुरूमगावचे प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अंकुश शेलार, ग्यारापत्तीचे प्रभारी अधिकारी रोहण गायकवाड, सावरगावचे ढेरे, कटेझरी पोलीस मदत केंद्राचे गोरडे, पीएसआय सतीश अंडेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, नक्षलवादी निष्पाप जनतेचा बळी घेतात. ते देशाचे शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करू नका. कुलभट्टी येथील नागरिकांना सिंचन, तलाव, हिरंगे ते कुलभट्टीपर्यंतच्या मार्गाचे खडीकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केले. तसेच गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल. उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांना मदत केली जाईल. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा पाठिंबा मिळणे कमी झाल्यास नक्षलवादी चळवळ आपोआप संपुष्टात येईल, असे प्रतिपादन केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन केले.
मेळाव्यात धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, येरकड, कटेझरी, ग्यारापत्ती परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कुलभट्टी, चव्हेला, केहकावाही येथील नागरिकांनी रेलानृत्य सादर केले. धानोरा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या आत्मसर्पित नक्षल कुटुंबांना प्रमाणपत्र व सायकलचे वाटप करण्यात आले. प्रगती, प्रयास अंतर्गत गावकऱ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याची शपथ नागरिकांना यावेळी देण्यात आली.

युवकांच्या पार पडल्या विविध स्पर्धा
मेळाव्यादरम्यान कबड्डी, व्हॉलिबॉल, रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या संघांना बक्षीस देण्यात आले. तसेच दहावी, बारावीमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याची टाकी, फवारणी पंप, सोलर लाईट, व्हॉलिबॉल, क्रिकेट साहित्य, शिलाई मशीन, मंडपाचे साहित्य, जीमचे साहित्य, साड्या, मच्छरदाणी, स्कूल बॅग, सायकल, ट्रायसिकल आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Attention to the development of remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस