चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलिस निरीक्षकाकडून मारहाण

By संजय तिपाले | Published: April 20, 2023 11:54 AM2023-04-20T11:54:25+5:302023-04-20T11:57:58+5:30

डावा हात फ्रॅक्चर, गळ्यालाही मार

Atul Ganyarpawar Ex-Chairman of Chamorshi Bazar Committee beaten up by Police Inspector | चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलिस निरीक्षकाकडून मारहाण

चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलिस निरीक्षकाकडून मारहाण

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चामोर्शी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना नाकाबंदी दरम्यान पोलिस निरीक्षकांनी मारहाण केल्याची घटना २० एप्रिल रेाजी पहाटे घडली. दरम्यान, गण्यारपवार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा या बाजार समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २० एप्रिल ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. चामोर्शीत सर्वपक्षीय विरुद्ध अतुल गण्यारपवार अशी लढत आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारांना ट्रॅव्हल्समधून एकत्रितपणे ते कोठेतरी पाठवित असल्याची त्यांच्याविरुद्ध तक्रार होती.

चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी १९ एप्रिलला वारंवार त्यांना फोन करुनही ते ठाण्यात आले नाहीत. २० रोजी पहाटे नाकाबंदीवेळी पो.नि. खांडवे व गण्यारपवार यांची भेट झाली. यावेळी खांडवे यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात गण्यारपवारांचा डावा हात फ्रॅक्चर असून गळ्यालाही मार आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गडचिरोलीचे पो.नि. अरविंदकुमार कतलाम यांनी गण्यारपवार यांचा जबाब नोंदवला आहे.

वन मॅन आर्मी

एकेकाळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक असलेले गण्यारपवार नंतर त्यांच्यापासून दुरावले. सध्या ते शेतकरी चळवळीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. गतवेळी सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित त्यांनी बाजार समितीत मुसंडी मारली होती. पाच वर्षे सभापतीपद भूषविल्यानंतर आता पुन्हा ते मैदानात उतरले आहेत. यावेळी देखील सर्वपक्षीय पॅनलसमोर ते एकटेच खिंड लढवित आहेत. चामोर्शी परिसरात त्यांचे वलय असून जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे. 

चामोर्शीतील घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गडचिरोली  ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीनंतर नेमके काय झाले हे समोर येईल, त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली

Web Title: Atul Ganyarpawar Ex-Chairman of Chamorshi Bazar Committee beaten up by Police Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.