वनधन केंद्रातर्फे कुकडेल येथे लेखाजोखा प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:38+5:302021-09-17T04:43:38+5:30
दोन वर्षांपासून महाग्राम सभा तालुका कोरचीच्या वतीने तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये ४ वनधन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक वनधन ...
दोन वर्षांपासून महाग्राम सभा तालुका कोरचीच्या वतीने तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये ४ वनधन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक वनधन केंद्रात तीनशे महिला - पुरुषांचे दहा गट तयार करून एक केंद्र स्थापित केले आहे.
महाग्राम सभेने प्रस्ताव तयार करून निधी प्राप्तीसाठी शासनाकडे पाठविला होता. शासनाने या प्रस्तावाला मान्यता देऊन आदिवासी विकास विभागामार्फत वनधन केंद्राना निधीची पूर्तताही केली. त्याअनुषंगाने मागील दोन वर्षांपासून समशेरगड वनधन विकास केंद्र, कुकडेल, रावपाठ गंगाराम घाट वनधन विकास केंद्र, साल्हे, कुवरपाठ वनधन विकास केंद्र, गहाणेगाटा, दंतसिरो वनधन विकास केंद्र, दोडके आदी चारही केंद्रातील वनधन गटामार्फत हंगामनिहाय गौणवनोपजांची खरेदी व विक्री केली जाते. पुढे या केंद्राच्या माध्यमातून खरेदी केलेल्या गौणवनोपजांची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रही खरेदी करण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी प्रत्येक केंद्रात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्याआधी प्रत्येक वनधन केंद्रातील व वनधन गटाचे रेकाॅर्ड अद्ययावत असणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून महाग्राम सभेतील कार्यकर्त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेऊन वनधन केंद्र व वनधन गटांचे नियोजन करुन प्रशिक्षण देत आहेत.
समशेरगड वनधन विकास केंद्र, कुकडेल व केंद्रातील गटांचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष अशा १० गटातील ३० महिला - पुरूषांचे रेकाॅर्ड अद्ययावत प्रशिक्षण आज पार पडले. याप्रसंगी साधनव्यक्ती म्हणून कुमारी जमकातन, झाडुराम हलामी, महाग्राम सभेचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी यांनी लेखाजोखा प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण घेण्यासाठी कुकडेलच्या १० गटातील पदाधिकारी उपस्थित हाेते. वनधन केंद्राचे सचिव यशवंत सहारे यांनी प्रशिक्षणाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
बाॅक्स
...या विषयांवर झाले मार्गदर्शन
ठरावबुक, खरेदी रजिस्टर, रोकडवही, आवक - जावक बुक, व्हाऊचर बुक, बिल बुक, लेझरबुक, स्टाॅक बुक, कच्चे रजिस्टर व केंद्राकडे लेटरपॅड असणे आवश्यक आहे.
खरेदी रजिस्टरवरून हिशेब वही भरणे, त्यासोबत लेझरबुक, स्टाॅक बुक कशी भरावीत, त्यांचेही प्रात्यक्षिक करून दाखविले. पुढील प्रशिक्षणात भरलेले रेकाॅर्ड तपासून काय कमतरता आहे, याची जाणीव ठेवून प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात आले. पुढील प्रशिक्षण दोडके येथे घेण्याचे ठरविण्यात आले.