चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:19+5:302021-07-02T04:25:19+5:30

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त ...

Awaiting beautification of Chamorshi lake | चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत

चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत

Next

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.

आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस

गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकरांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोडही होते. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्तच

एटापल्ली : अतिदुर्गम भागांत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले; परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे नाकाम झाले आहेत.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिरांची गरज

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतुकीविषयी कुठलेही ज्ञान व नियम आत्मसात नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे.

कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा

कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यांवरच वाहने उभी करतात.

भेंडाळातील विद्युत उपकेंद्र प्रभारींवर

भेंडाळा : येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत २७ गावांत वीजपुरवठा केला जातो. परंतु सध्या या उपकेंद्राचा भार प्रभारी अभियंत्यांवर असल्याने वेळीच विद्युत बिघाड दुरुस्ती करण्याच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे येथे स्थायी अभियंता नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मार्कंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसथांब्यानजीक शौचालय, मूत्रीघर बांधा

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

कमाल जमीन धारणेची अट रद्द करा

अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरांची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असल्याचे दिसून येते.

आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.

भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.

भामरागड तालुक्यातील गावे लाइनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाइनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साइन बोर्ड दुरुस्त करा

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साइन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र, ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकांवर लिहिलेली अक्षरे मिटल्याने अडचण होते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी

गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र, या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोडके अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथ खरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

देसाईगंज : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तालुक्याच्या अनेक गावांतील जनावरांचे काेंडवाडे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत.

स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास

काेरची : तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Awaiting beautification of Chamorshi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.