व्हीव्हीपॅट जागृतीसाठी जिल्ह्यात ३७ पथके सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:16 PM2018-12-24T22:16:46+5:302018-12-24T22:17:19+5:30
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे मुद्रित पावतीची सुविधा असणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असल्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरात त्याचे प्रात्याक्षिक दाखविणे सुरू झाले. त्यासाठी ३७ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे मुद्रित पावतीची सुविधा असणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असल्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरात त्याचे प्रात्याक्षिक दाखविणे सुरू झाले. त्यासाठी ३७ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांमध्ये एकतर्फी निकाल लागले. त्यामुळे मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान यंत्र न वापरता जुन्या पद्धतीने मतपत्रिकेतूनच मतदान घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा पर्याय समोर आला आहे.
बंगलोरमध्ये तयार झालेल्या या नवीन यंत्रात मतदाराने कोणाला मत दिले याची छापिल पावली तयार होणार आहे. ती पावती मतदाराला मशिनमध्ये दिसून नंतर मतपेटीत बंदीस्त होईल. मतमोजणीच्या वेळी मतदान यंत्राच्या निकालावर एखाद्या उमेदवाराने आक्षेप घेतल्यास मतपेटीत बंदीस्त असलेल्या मतदारांच्या पावत्या तपासून मतमोजणी केली जाईल. या प्रक्रियेत मतमोजणीला वेळ लागण्याची शक्यता असली तरी मतदान यंत्रावरील विश्वासार्हतेची पडताळणी त्यातून करणे शक्य होणार आहे. जनजागृती कार्यक्रमांतर्गत माध्यम प्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, शासकीय वसाहती, पोलीस ठाणे, बँक मुख्यालय, बाजाराचे ठिकाण अशा ठिकाणी स्वतंत्र कार्यक्रम तयार करून राबविला जाणार आहे.
७४९ गावांना भेट देणार
एव्हीएम (मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट यांची कार्यपद्धती मतदारांना योग्यरित्या समजावून सांगण्यासाठी नियुक्त केलेली ३७ पथके जिल्ह्यातील ७४९ गावांमध्ये जाऊन जागृती करणार आहेत. त्यासाठी त्यांना ११ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.
सर्वाधिक गावे गडचिरोली मतदारसंघात
आरमोरी विधानसभा मतदार संघातील १९५ गावांसाठी १० पथके पथके असून ती २४ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत फिरणार आहेत. गडचिरोली मतदार संघात २७८ गावांसाठी १२ पथके असून ती ३० जानेवारीपर्यंत जनजागृती करतील. तर अहेरी मतदार संघात २७६ गावांसाठी १४ पथके असून ती ११ जानेवारीपर्यंत ठिकठिकाणी फिरणार आहेत. याशिवाय एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात राहून जनजागृती करणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील.