आरोग्याबाबत जागृतीची गरज
By admin | Published: August 1, 2015 01:14 AM2015-08-01T01:14:50+5:302015-08-01T01:14:50+5:30
प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन : हेमलकसा येथे प्रचार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजुनही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. शासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. असे झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचेही आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात माता व बाल आरोग्य अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य (लसीकरण) अभियान निमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे सहायक निर्देशक प्रभावती आकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा प्रभावती आकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रसंशनीय असल्याचे प्रतिपादन केले. बालकाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बालकाची काळजी कशा पध्दतीने घेण्यात यावी, बालकांना होणारे विविध प्रकारचे आजार यावरसुध्दा प्रकाश टाकला. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा प्रदेश सहायक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)