काेविड मार्चमधून नागरिकांमध्ये जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:33+5:302021-04-08T04:37:33+5:30
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात संसर्गाची भीती आहे. भामरागड तालुक्यात जिल्ह्यासह दुसऱ्या राज्यातून नागरिक ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात संसर्गाची भीती आहे. भामरागड तालुक्यात जिल्ह्यासह दुसऱ्या राज्यातून नागरिक येतात. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. आपण व आपला तालुका सुरक्षित ठेवावा, असे आवाहन एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. दोन दिवसांपूर्वी भामरागड प्रशासनातर्फे बुधवारच्या आठवडी बाजारसह दैनंदिन व्यापार दुकानेही बंद ठेवण्यविषयी येथील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यानुसार बुधवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. भामरागड तालुक्यात काेराेनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, दुकानदार व हॉटेल चालकांनी मास्क वापरणे व शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक दुकानदारांनी १५ दिवसात एक वेळा काेराेना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्याचीही सूचना देण्यात आली. कोविड मार्चमध्ये उप विभागीय अधिकारी मनुज जिंदल, भामरागडचे प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पाेलीस निरीक्षक किरण रासेकर, पीएसआय मंगेश कराडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज जाधव, संवर्ग विकास अधिकारी राहुल चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्रम याच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
बाॅक्स
केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी
भामरागड तालुक्यात संपूर्ण आठवडाभर दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंतच सुरू राहतील. रुग्णालये, मेडिकल, किराणा, बाजीपाला, मिठाई दुकाने, मांसविक्री, कृषी संबधित दुकाने तसेच पेट्रोल पंप सुरू राहतील. तसेच कपडे, भांडे, हार्डवेअर, मोबाईल सलून, ब्युटीपार्लर, आटोमोबाईल्स, इलेक्ट्राॅनिक्स दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहती. सर्व दुकानदारांनी दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोय करणे बंधनकारक राहिल व स्वतः दुकानदारांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे, असे उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.