जागृतीमुळे रानभाज्यांची विक्री वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:46+5:302021-08-21T04:41:46+5:30
रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची आदिवासी समाजाला पारंपरिकरीत्या माहिती असते. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. ...
रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची आदिवासी समाजाला पारंपरिकरीत्या माहिती असते. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात रानभाज्या दिसून येतात. कुड्याची भाजी, तराेटा भाजी या वनस्पतींपैकी काहींचा वापर आदिवासी समाजात विशिष्ट सणादरम्यान तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून विविध पदार्थ बनविले जातात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न तयार होतात. काही भाज्या थंड, तर काही उष्णधर्मीय आहेत. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.
कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी, मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. हा फरक सरावाने ओळखता येतो. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत शाकाहारी किंवा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घेता येतो.