ताडगावात जागतिक डास दिनानिमित्त जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:41+5:302021-08-22T04:39:41+5:30
भामरागडसारख्या अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात अतिवृष्टी, घनदाट अरण्य, नदी, नाले आदींमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी साथीचे आजार ...
भामरागडसारख्या अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात अतिवृष्टी, घनदाट अरण्य, नदी, नाले आदींमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी साथीचे आजार वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा नागरिकांमधील अज्ञानामुळे व निष्काळजीपणामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या भयानक आजाराने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. दरवर्षी २० ऑगस्ट हा ‘जागतिक डास दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी डॉ. रोनाल्ड रॉस यांनी १९८७ मध्ये संक्रमित मच्छर चावल्याने मलेरिया होतो, याचा शोध लावला होता.
मच्छर दिनाचे औचित्य साधून भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सीआरपीएफ सी-०९ दलाचे असिस्टंट कमांडंट शामसिंग रावत व ताडगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सौरभ पिंगळे यांच्या संकल्पनेतून पाेलीस निरीक्षक जाट, पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे, मनोहर वांढे व पोलीस जवानांच्या वतीने ताडगाव येथील मुख्य बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, वसतिगृह, गटारी, नाले, लोकवस्ती, घरे आदींमध्ये ‘मच्छर धूर फवारणी’ करण्यात आली. तसेच घरोघरी जाऊन डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती केली. डास निर्माण होणारी ठिकाणी जसे कूलर, टायर्स, ताडाची फळे, साचलेले डबके, पाणी साचून राहणारी ठिकाणे वारंवार स्वच्छ ठेवावी, मच्छरदाणीचा वापर करावा, आजाराची लक्षणे दिसताच अंधश्रद्धेला बळी न पडता, पुजाऱ्याकडे न जाता तत्काळ डॉक्टरांना भेटावे व उपचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी पाेलीस हवालदार विनोद कुडसंगे, पोलीस शिपाई नितीन आठवले, रमेश तेलामी, वालदे, नाकतोडे, पोले यांच्यासह सीआरपीएफ दलाचे सर्व जवान हजर हाेते.
210821\img-20210820-wa0011.jpg
पोलीस अधिकारी जवान स्वच्छतेची संदेश देत जनजागृती करताना