गडचिरोलीत प्रबोधन दिंडीतून युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:28 PM2018-01-27T18:28:56+5:302018-01-27T18:29:22+5:30
धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी वैचारिक जडणघडणीसाठी युवकांनी या संमेलनाला आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
पूजेच्या माध्यमातून मानसिक विकार दूर होतात. मात्र काही नागरिक पूजेचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करतात. अशा भोंदंपासून सावध राहावे, असे आवाहन गडचिरोली येथील महिला महाविद्यालयात बोलताना रक्षक यांनी केले. रविवार दि.२८ जानेवारी रोजी मेंढा-लेखा येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाला युवा विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिकाधिक राहावी, या उद्देशाने ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ या उपक्रमांतर्गत या जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला डॉ.शिवनाथ कुंभारे, डॉ.सतीश गोगुलवार, पंडित पुडके, प्राचार्य डॉ.सुरेश खंगार, डॉ.काकड, रवी मानव आदी गुरूदेव सेवक उपस्थित होते.
प्रार्थनेच्या माध्यमातून आपण देवासोबत कमिटमेंट करतो, त्यामुळे भक्तीपेक्षा प्रार्थनेला ग्रामगीतेत अधिक महत्त्व देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयातील आजचे विद्यार्थी भावी भारताचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ सक्षम, प्रामाणिक, निर्व्यसनी, सुशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनात अधिकाधिक युवकांची उपस्थिती राहावी यादृष्टीने प्रयत्न आहेत, असे रक्षक म्हणाले.
मेंढा-लेखा येथील कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गावगणराज्य साहित्य नगरीत रविवार दि.२८ ला सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद) चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी १२ ते ४ दरम्यान दोन परिसंवाद, दुपारी ४ ते ५ दरम्यान देवाजी तोफा आणि भास्कर पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत आणि सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.