अॅक्सिस बँंकेतच राहणार पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:20 AM2018-03-06T00:20:40+5:302018-03-06T00:20:40+5:30
भूमिगत गटार योजनेसाठी राज्य शासनाने दिलेला २० कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेने अॅक्सिस बँकेमध्ये जमा ठेवण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : भूमिगत गटार योजनेसाठी राज्य शासनाने दिलेला २० कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेने अॅक्सिस बँकेमध्ये जमा ठेवण्यात आला आहे. अॅक्सिस बँक खासगी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या बँकेएवजी सदर निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. मात्र राष्ट्रीयकृत चालू खात्यावर अत्यंत कमी व्याज देत असल्याने सदर निधी अॅक्सिस बँकेमध्येच ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेतला.
गडचिरोली शहरातील शाळा, महाविद्यालये, रूग्णालये यांच्या जवळचा परिसर ध्वनीप्रदुषणमुक्त म्हणून घोषीत करण्यात येईल. या ठिकाणी तशा प्रकारचे फलक लावले जाणार आहेत. फुले वार्डातील सार्वजनिक शौचालयांकरिता सबमर्शीबल पंप बसवून व पाण्याची टाकी उभारली जाईल. याच वार्डातील कमकुवत असलेले सार्वजनिक शौचालय तोडले जाणार आहेत. संत गाडगेबाबा नगर परिषद शाळा लांझेडा येथे बोअरवेल खोदून पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याची सोय होणार आहे. शहरातील ६७ अपंग लाभार्थ्यांना तीन टक्के अपंग निधीतून मदत दिली जाणार, अशा प्रकारच्या ठरावांना नगर परिषदेच्या स्थायी समितीने परवानगी दिली.
महिला कर्मचाऱ्याला ९०० रूपयांची साडी
नगर परिषदतर्फे सफाई कामगारांना गणवेश पुरविले जाणार आहे. महिला सफाई कर्मचाऱ्याला ९०० रूपये किमतीची साडी खरेदी करून दिली जाणार आहे. साडीची किंमत व प्रत्यक्ष नमुना बघून काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. गणवेशाची रक्कम सफाई कर्मचाºयांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यास ते गणवेश खरेदी करीत नाही. त्याचबरोबर एकाच प्रकारचे गणवेश खरेदी करीत नाही. ही बाब समोर करून त्यांना नगर परिषदच गणवेश खरेदी करून देईल, असा निर्णय घेतला.