रूग्णवाहिकेअभावी बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:36 AM2018-05-14T00:36:16+5:302018-05-14T00:36:16+5:30
वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर माता घरीच प्रसुती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवजात बालकाची प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान अहेरी रूग्णालयात रविवारी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर माता घरीच प्रसुती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवजात बालकाची प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान अहेरी रूग्णालयात रविवारी मृत्यू झाला.
अहेरी तालुक्यातील ताटीगुडमटोला येथील रहिवासी विनोदा कृष्णा पेंदाम हिला शुक्रवारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. आशावर्कर सरीता पेंदाम हिने रूग्णवाहिकेसाठी कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मानकर यांच्याकडे संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र वेळेवर रूग्णवाहिका ताटीगुडमटोला येथे पोहोचली नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता विनोदा ही घरीच प्रसुती झाली. प्रसुतीनंतर नवजात बालकाने मातेचे दूधही प्राशन केले. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा रूग्णवाहिकेसाठी आशावर्करने संपर्क केला असता, शनिवारी सुध्दा रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती. काही वेळानंतर १०८ ची रूग्णवाहिका ताटीगुडम टोला येथे पोहोचली. नवजात शिशू व मातेला रूग्णवाहिकेत बसवून उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे भरती केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी नवजात बालकाचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, ताटीगुडमटोला हे गाव कमलापूरपासून दोन किमी अंतरावर आहे. तरीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. रूग्णवाहिका ही २४ तास रूग्णालयासमोर उपलब्ध असणे आवश्यक असते. असे असतानाही डॉ. ज्योती डोंगरे यांनी सदर रूग्णवाहिका इतर कामासाठी वापरली. त्यामुळे वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक रूग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे तत्वावर दुसरी रूग्णवाहिका भाड्याने ठेवली आहे. मात्र ही रूग्णवाहिका डॉ. ज्योती डोंगरे यांनी नेली होती. त्यामुळे वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध करून देता आली नाही. प्रसुतीनंतर बाळ व मातेची प्रकृती तपासण्यासाठी परिचाकेला पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती बिघडल्याचे माहित झाल्यानंतर १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देऊन बाळाला व मातेला अहेरी रूग्णालयात हलविले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.
- डॉ. राजेश मानकर, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, कमलापूर