दवाखान्यात भरती करण्याच्या भीतीने दुर्गम भागात लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:17 PM2021-06-14T12:17:20+5:302021-06-14T12:19:15+5:30
Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काेराेनासारख्या महामाऱ्या यापूर्वीही आल्या आहेत. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन महामारीवर मात केली आहे. आजही आम्ही काढा पित असल्याने आम्हाला काेराेना हाेऊ शकत नाही. त्यामुळे लस घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगत वयाेवृद्ध नागरिक स्वत: लस घेण्यास स्पष्ट नकार देत आहेत. त्यांचे अनुकरण इतर कनिष्ठ लोक करत असल्याने त्यांना समजावता समजावता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे.
जिल्ह्याच्या कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील गावांमध्ये गैरसमजाचे प्रमाण जास्त आहेत. आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळी लस आहे व सामान्य नागरिकांसाठी वेगळी लस दिली जाते. लस घेतल्याने अनेक आजार हाेतात. त्यानंतर त्या व्यक्तीला गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती केले जाते. यादरम्यान किडन्या काढल्या जातात. मृतदेहसुद्धा नातेवाइकांच्या हाती न देता परस्पर जाळून टाकल्या जाते, असा गैरसमज असल्याने अजूनही लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसते. १२ जूनपर्यंत काेरची तालुक्यात केवळ ३ हजार ९८९, भामरागड तालुक्यात ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यांचा विस्तार व लाेकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अतिशय कमी आहे.
आराेग्य कर्मचारी येताच दरवाजे हाेतात बंद
प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र गैरसमजावरून निर्माण झालेली लसविषयीची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करून बसली असल्याने नागरिक लसीकरणास पुढे येत नाही. गावात आराेग्य कर्मचारी आल्याचे माहीत हाेताच नागरिक दरवाजे बंद करून घरात लपून बसतात किंवा शेतावर निघून जातात.
हे आहेत विविध गैरसमज
१) वनस्पतींचा काढा पीत असल्याने लसची गरज नाही.
२) यापूर्वी अनेक महामाऱ्या बघितल्या आहेत.
३) लसीच्या नावाने काेराेना चाचणी केली जाते.
४) काेराेनाच्या नावाने गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती करून किडनी काढली जाते.
५) सरकार लाेकसंख्या कमी करण्यासाठी लस देऊन मारणार आहे.
६) मेल्यानंतर मृतदेह परस्पर जाळून टाकल्या जाते.
७) शरीर कमजाेर हाेते.
८) लसने अनेक दिवस ताप येते. नंतर मृत्यू हाेतेे.
९) पुढे मुलबाळ हाेत नाही.
कोविडच्या साथीवर विजय मिळवण्याचा सर्वात प्रभावी उपाय लस आहे. हा विज्ञानाचा चमत्कार की नवा रोग आल्यावर वर्षभरात त्यावर लस उपलब्ध झाली आहे. नवा उपाय स्वीकारायला समाज सहसा बराच काळ घेतो. पण या वेळेस आपण वेळ दवडता कामा नये. जो लस घेईल तो स्वतःचे रक्षण करेल व इतरांचेही.
डाॅ अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक