लोकप्रतिनिधी भांडवलदारांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:42 AM2018-09-09T00:42:34+5:302018-09-09T00:44:05+5:30
बहुजन आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले जाणारे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. ते भांडवलदारांच्या पाठीशी जात असल्यामुळे बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बहुजन आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले जाणारे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. ते भांडवलदारांच्या पाठीशी जात असल्यामुळे बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
येथील इंदिरा गांधी चौकात पक्षाच्या निर्धार मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते अॅड.राजेंद्र कोरडे, मिलींद कांबळे, जयश्री वेळदा, रामदास जराते आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, सध्या देशात आणिबाणीपेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सर्व पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. ज्या ठिकाणी उच्च-निच अशी दरी निर्माण होते तिथे आमचा लाल बावटा पोहोचतो. एक वेळ शेकापला संधी द्या, आम्ही चित्र बदलून टाकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. राज्यात शेतमालाला हमीभाव देण्याची सुरूवात आपल्याच पक्षाच्या मागणीवरून झाली. एन.डी.पाटील सहकारमंत्री असताना कापूस एकाधिकार योजना आपल्याच पक्षामुळे लागू झाली. एवढेच नाही तर शेतकºयांना कृषी कर्जवाटपाची सुरूवातही आपल्याच पक्षामुळे झाल्याचे पाटील म्हणाले.
या मेळाव्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या नावावर येणारा पैसा कागदावर खर्च होतो. नोकरशाहीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा दबाव नाही, असाही आरोप त्यांनी केला.
मेळाव्याच्या सुरूवातीला रामदास जराते यांनी आपल्या प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका मांडली. मेळाव्याचे संचालन जयंत निमगडे यांनी तर आभार सुधाकर आभारे यांनी व्यक्त केले.
नक्षलवाद हा पर्याय नाही
आदिवासींवर वर्षानुवर्षे होत असलेल्या अन्यायामधून येथे नक्षलवाद फोफावला. पण हिंसेचा अवलंब करणारा नक्षलवाद त्यावर पर्याय ठरू शकत नाही, असे आ.पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. आम्ही अहिंसेच्या मार्गाने लढणारे, चळवळ उभी करणारे आणि ती यशस्वी करणारे आहोत, असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसला मार्केटिंग जमत नाही
युपीए सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले आहेत. आज प्रकल्पग्रस्तांना चार पट मोबदला दिला जात आहे. तो निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींनी तत्कालीन युपीए सरकारला बाध्य केले होते. पण काँग्रेसला अशा चांगल्या कामांचे मार्केटिंग करणे जमत नाही, अशी खंत आ.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आहेत. आर्थिक निती ठरविण्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांची समिती केली होती. त्यांच्याशी नियमित चर्चा होत असे. मात्र आज मोदी आणि शहा हेच अर्थनिती ठरवतात, अशी टिका त्यांनी केली.