दुग्धजन्य पदार्थातील जिवाणूचा वापर कोविड नियंत्रणासाठी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:41+5:302021-06-01T04:27:41+5:30
कुरखेडा : सध्या कोविड उपचारासाठी बऱ्याच औषधींचा वापर होत आहे; पण त्यांचे दुष्परिणामही काही प्रमाणात दिसून येत आहेत. यालाच ...
कुरखेडा : सध्या कोविड उपचारासाठी बऱ्याच औषधींचा वापर होत आहे; पण त्यांचे दुष्परिणामही काही प्रमाणात दिसून येत आहेत. यालाच एक पर्याय म्हणून कोविडसाठी म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश हलामी आणि त्यांचे सहकारी संशोधन करीत आहेत. त्यात दुग्धजन्य पदार्थातील जिवाणूचा कोविड नियंत्रणासाठी वापर करण्याचे तंत्र विकसित केले जात आहे. आपल्या या संशोधन कार्यात अंतिम ध्येयापासून थोड्याच अंतरावर असल्याची माहिती डॉ. हलामी यांनी एका ऑनलाईन व्याख्यानात दिली.
डॉ. हलामी हे मूळचे गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला या गावचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर विद्यापीठाने नुकतेच त्यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. त्यात त्यांनी या संशोधनाबद्दल थोडीफार माहिती दिली.
आम्ही एका तंत्रज्ञानाचा विकास करीत असून, त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थात असलेल्या जिवाणूंचा वापर करून कोरोना नियंत्रित करू शकतो. म्हणजे लहानपणी आईच्या दुधापासून मिळणारे घटक, जे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करतात, त्यांचा वापर कोविडसाठी पूरक उपचार म्हणून करू शकतो. हे जिवाणू कोविडला प्रतिबंधित करू शकतात, असे डॉ. हलामी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ सर्वसामान्यांना सहज परवडणारे असून, ते सहज उपलब्धही होऊ शकतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो. या तंत्रज्ञानावर कार्य सुरू असून, कोविडच्या रुग्णावर चाचणी केल्यानंतर लवकरच ते उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या व्याख्यानात वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरेही सविस्तरपणे डॉ. हलामी यांनी दिली. या ऑनलाईन व्याख्यानाचे संचालन मंदसौर विद्यापीठातील जीवशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. आशिष वरघने यांनी केले.
===Photopath===
310521\img-20210531-wa0046.jpg
===Caption===
फोटो डाॅ प्रकाश हलामी