बाम्हणी मार्गाची दुरवस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:35 AM2021-02-12T04:35:00+5:302021-02-12T04:35:00+5:30
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी ...
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मोहटोला परिसरात वीज जोडणी मिळाली नाही.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंबकल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
चामोर्शीत वाढला मोकाट जनावरांचा त्रास
चामोर्शी : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अनेक वॉर्डांमध्ये मोकाट जनावरे उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. जनावरांमुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
घोट : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होईल, त्यामुळे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी घोट परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हा चांगला शेतीला पूरक व्यवसाय होऊ शकतो.
बीएसएनएल टॉवरअभावी कव्हरेजची समस्या
धानोरा : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. या गेल्या बऱ्याच दिवसांपासून तालुक्यात कव्हरेजची समस्या गंभीर बनली आहे.
एकोडी- वेलतूर मार्गावर काटेरी झुडपे कायमच
चामोर्शी : तालुक्यातील एकोडी- वेलतूर तुकूम मार्गावरील दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. यातून अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सदर झुडपे त्वरित तोडावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मालेवाडा पीएचसीला रुग्णालयाचा दर्जा द्या
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे. परंतु या मागणीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्षच आहे.
जि.प. मध्ये लिफ्टचा प्रस्ताव रखडला
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृध्द व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.