खड्ड्यांमुळे बेडगाव मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:58+5:302021-03-23T04:38:58+5:30
कोरची-बेडगाव या ४ किमी मार्गावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या मार्गाची अनेकदा डागडुजी करण्यात आली. परंतु डागडुजीनंतर ...
कोरची-बेडगाव या ४ किमी मार्गावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या मार्गाची अनेकदा डागडुजी करण्यात आली. परंतु डागडुजीनंतर अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होऊन स्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाकडे मागणी केल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु मार्गावरील खड्डे पूर्णत: बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे अल्पावधीतच अवस्था जैसे थे झाली. विविध विभागांचे कर्मचारी ये-जा करण्याकरिता याच मार्गांचा वापर करतात. त्यामुळे या मार्गाची केवळ डागडुजी न करता पूर्णत: नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कोरची-बेडगाव मार्गासह कोरची तालुक्यातील अनेक मार्गांची दुरवस्था झाल्याने दुरूस्तीच्या मागणीसाठी सरपंच व इतर संघटनांमार्फत अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. रस्त्यांची केवळ डागडुजी करण्यात आली. परंतु नूतनीकरणाकडे दुर्लक्ष झाले. लोकप्रतिनिधी व यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
बाॅक्स
अवजड वाहनांची वर्दळ
कोरची येथून छत्तीसगडला जाण्यासाठी छोटी वाहने तसेच जड वाहनांची दिवस-रात्र याच मार्गावर वर्दळ असते. मागीलवर्षीच्या पावसाळ्यात मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली. विशेष म्हणजे या रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मागीलवर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावरील खड्ड्यांमध्ये भर पडली. सध्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, येथून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहने आवागमन करीत असतात.