मुरमाड जागेवर बहरली गर्द वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:00 AM2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:02+5:30
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे.
पुरूषाेत्तम भागडकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : वडसा वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांच्या पुढाकारात वन विभागाने शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. ओसाड जागेवर माेठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संरक्षण व संवर्धनावर जोर दिल्याने देसाईगंज तालुक्यात वनराई बहरू लागली आहे.
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे. तर एकलपूर, कसारी, पिंपळगाव (ह.), शिवराजपूर या गावांना जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/रिठ येथील वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी व भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत मिळेल.
पर्यायी मिश्र रोपवनांतर्गत माती परीक्षण करून त्या जागेवर तग धरू शकणारीच विविध प्रजातींची झाडे लावण्यात आल्याने सदर जागेवर वनराई बहरविण्यात वन विभागाला यश आले आहे. यासाठी नुकतेच निवृत्त झालेले सहायक उपविभागीय वनसंरक्षक व्ही.बी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांचे स्थानांतरण झाले आहे. त्यांचे जागी येणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनीही अशीच मौलिक भूमिका बजावावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
२० हेक्टरवर आहेत २२ हजार २२० झाडे
अनेकांनी अतिक्रमण केलेली २० हेक्टर शासकीय जागा वन विभागाने मोकळी केली. संपूर्ण जागा कुंपणाखाली आणून एकूण २० हेक्टर जागेत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतग॔त २२ हजार २२० वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण व संवर्धन शिवराजपूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुरू केल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष बाब अशी की यासाठी हेक्टरी १ हजार १११ रोपे लावण्यात आली. प्रत्येक रोपातील अंतर ३ बाय ३ मीटर ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे सर्वच राेपे जिवंत आहेत. मुरमाड जागेवर वृक्ष लागवड करून वनराई फुलविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे काैतुकही केले जात आहे.