बांबूचा पूल बनला त्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:47 PM2017-10-05T23:47:42+5:302017-10-05T23:48:25+5:30
जिल्ह्याच्या निर्मितीला ३४ वर्षे लोटली तरी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विकासाची पहाट अजूनही उगवलीच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या निर्मितीला ३४ वर्षे लोटली तरी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विकासाची पहाट अजूनही उगवलीच नाही. त्यामुळेच पुलाअभावी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलो. यावर उपाय म्हणून गावकºयांनीच श्रमदानातून बांबूचा पूल तयार करण्याचा यशस्वी प्रयोग गुंडेनूरजवळ करण्यात आला आहे.
गुंडेनूरच्या नाल्यावर तयार केलेल्या १५० फूट लांब आणि ६ फूट रुंदीच्या या पुलामुळे गाववकºयांच्या भामरागड या तालुका मुख्यालयाशी तुटलेला संपर्क पुन्हा जुळला गेला आहे. बांबू, लाकूड आणि दगड या स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाºया साधनांचा उपयोग करून गावकºयांनी श्रमदानातून उभारलेल्या या पुलातून एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या समस्या आपणच सोडविण्याच्या या उपक्रमाने ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
भामरागड या दुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यात अनेक मार्गावर चांगले रस्ते नाहीत. एवढेच नाही तर नद्यांवर पूलही नाहीत. त्यामुळे नदीपलिकडील गावकºयांना होडी, डोंग्याच्या आधारे नदी पार करावी लागते. नदीला पूर असताना तर त्या गावांचा संपर्कच तुटून जातो. या अवस्थेत वर्षानुवर्षे जीवन कंठत असलेल्या त्या गावकºयांच्या समस्या प्रशासनाने सोडविल्या नसल्यामुळे अखेर गावकºयांनीच त्यावर उपाय शोधला. लाहेरीपासून ५ किमी अंतरावरील गुंडेनूर गावाजवळून गुंडेनूर नाला वाहतो. या नाल्याचे पात्र खोल व मोठे असल्याने पावसाळ्याभर व नंतरही तो वाहात असतो. यामुळे भामरागड, लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी, तुरेमर्का, फादेवाडा, पेरमिलभट्टी आदी गावांचा संपर्क तुटतो. यामुळे शाळकरी मुलांना शाळा, बालवाडीत जाता न आल्यामुळे शिक्षणात खंड पडतो. जीवनावश्यक गरजांसोबत शासकीय योजनांपासूनही वंचित राहावे लागते. शासकीय कामे वेळेवर न झाल्यामुळे अनेकअडचणींचा सामना करावा लागतो. गुंडेनूर, इडियानाला नाल्यावर कायमस्वरूपी पक्का सिमेंट क्राँक्रिटचे पूल बांधल्या गेल्यास रहदारी आणि संपर्क तुटण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल.