बनावट आरडी बुक तयार करून बॅंक ग्राहकांची ५ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 04:57 PM2022-12-02T16:57:27+5:302022-12-02T16:57:33+5:30
काेरची येथील एसबीआय सेवा केंद्रातील प्रकार, दाेघांना अटक
कोरची (गडचिरोली) : कोरची येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाली असून, कोरची पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना मंगळवारी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रामध्ये शेतकरी व अशिक्षित अशा खातेधारकांचे बनावट खाते तयार करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते.
नंदकिशोर सदानंद कावळे यांनी दिलेला तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी संजीत अशोक सरजारे (वय २९, रा. नान्ही, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली), वीरेंद्र टेंभुर्णे (रा. कोसमी, ता. कोरची, जि. गडचिरोली) यांना ग्राहक सेवा केंद्र चालवण्याकरिता दिले हाेते. या दोघांनी ग्राहक सेवा केंद्रावर खातेधारांचे बनावट आरडी खाते पासबुक तयार केले. त्यावर बनावट खाते क्रमांक लिहून खातेदारांनी जमा केलेली रक्कम ही स्वतःजवळ ठेवून खातेदारांच्या पैशाचा अपहार करून खातेदारांची एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच यापूर्वी बँकेच्या खातेदारांचे हजारो रुपये खात्यात जमा करण्यासाठी खातेदारांनी दिले होते. परंतु रक्कम जमा केल्याची पावती हातात देऊन महिने उलटूनही खात्यात रक्कम जमा केले नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खासगी कंपनी पे पॉइंट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांना विश्वासाने ग्राहक सेवा केंद्र चालवण्यासाठी दिले होते. परंतु ग्राहक सेवा केंद्र चालविणारे आरोपींची तक्रार स्टेट बँकेला मिळताच बँकेने कंपनीला याबाबत तक्रार पाठविले. सदर कंपनीने दोघाविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. कोरची ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, गडचिरोली पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू व कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा अधिक तपास कोरची पोलिस निरीक्षक अमोल फळतरे हे करीत आहेत.
जमा पावत्या दिल्या, मात्र पैस जमा केलेच नाही
परिसरातील काही नागरिक या केंद्राच्या मार्फतीने बॅंकेत पैसे जमा करीत हाेते. यात नागरिकांना पैसे जमा केल्याची पावती संबंधितांनी दिली आहे. मात्र, त्यांचे पैसे महिनाभराचा कालावधी हाेऊनही जमा केला नाही. त्यामुळे हे पैसे सुद्धा त्यांनी लंपास केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरिबांनी काय करावे
या केंद्रात पैसे भरणारे बहुतांश नागरिक आहेत. बचतीची सवय लागावी म्हणून खाते काढून पैसे जमा केले. मात्र, त्यांचे पैसे गहाळ करण्यात आले आहेत. त्यांच्या पैशाची जबाबदारी स्टेट बॅंक ऑफ इंडिया घेणार काय हा प्रश्न आहे.