कर्मचाऱ्यांअभावी एटापल्लीतील बँक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:50 PM2018-05-07T23:50:16+5:302018-05-07T23:50:55+5:30
स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही. सोमवारी कार्यरत कर्मचाºयांपैैकी दोन कर्मचारी सुटीवर तर एक कर्मचारी रोकड आणायसाठी गेले. कॅश कॉऊंटरवर एकही कर्मचारी नसल्याने अखेर शाखा व्यवस्थापक योगेश दत्त यांनी चक्क बँकेचा मुख्य दरवाजाला कुलूप लावले. बँक बंद असल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
दुपारच्या सुमारास नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती जितेंद्र टिकले व बांधकाम सभापती किसन हिचामी यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकासोबत चर्चा केली. त्यानंतर बँक उघडण्यात आली. मात्र बँकेच्या दरवाजाला कुलूप असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत या बँक शाखेतील आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प होते. २५ मे १९७८ मध्ये तालुक्यात कुठलीही बँक नसताना एटापल्ली येथे स्टेट बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा सुरू करण्यात आली. सदर राष्ट्रीयकृत बँक शाखेला आजघडीस ४० हून अधिक वर्ष उलटले आहेत. एटापल्ली तालुक्यात ही बँक शाखा वगळता इतर कोणतीही दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. सदर बँकेचे २५ हजारवर खातेदार असून दररोज ४० ते ५० लाख रूपयांची उलाढाल होत असते. तसेच ५५ कोटी पेक्षा अधिक रक्कम या बँक शाखेत खातेदारांची जमा आहे. येथील कार्यरत कर्मचारी प्रामाणिक सेवा देत आहेत. मात्र रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचारीही हतबल झाले आहेत.
या बँक शाखेतील विविध समस्यांची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार दिल्या जाते. परंतु एकही समस्या मार्गी लावली जात नसल्याची खंडत येथील शाखा व्यवस्थापकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. प्रस्तूत प्रतिनिधीने याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व ठाणेदार जगताप यांना दिली. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करू, असे सांगितले. बँक बंद असल्याने ग्राहकांना फटका बसला.