कर्जमुक्ती याेजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका शेतकऱ्यांवर मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:27+5:30
खरीप व रब्बी दाेन्ही हंगामासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख पीककर्ज याेजनेंतर्गत हे कर्ज बिनव्याजी राहते. त्यासाठी संबंधित कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही. थकीत कर्जदाराला बॅंका पुन्हा नव्याने कर्ज देत नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील काही वर्षांमध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटत चालली हाेती. मात्र, राज्य शासनाने कर्जमुक्ती याेजना राबवून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्यामुळे मागील वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सुमारे ३५ हजार १५ शेतकऱ्यांना १६२ काेटी ३८ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
खरीप व रब्बी दाेन्ही हंगामासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख पीककर्ज याेजनेंतर्गत हे कर्ज बिनव्याजी राहते. त्यासाठी संबंधित कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही. थकीत कर्जदाराला बॅंका पुन्हा नव्याने कर्ज देत नाही.
भाजप शासनाने २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना राबविली. या याेजनेंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीतील थकीत कर्ज माफ केले. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळण्यास उशीर झाला, तसेच २०१६ नंतरचेही कर्ज माफ हाेईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले नाही. थकीत कर्जदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते.
त्यानंतर, पुन्हा विद्यामान राज्यशासनाने २१ डिसेंबर, २०१९ राेजी महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली. या याेजनेंतर्गत पुन्हा ३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ केले. या दाेन्ही याेजनांतर्गत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याने, २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची उचल करण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. मात्र कर्ज फेडीत ते आघाडीवर आहेत.
या वर्षीही कर्जदार वाढणार
काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम अगदी दाेन महिन्यांपूर्वी जमा झाली आहे. त्यामुळे हे शेतकरी मागील वर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरले नव्हते. हे शेतकरी आता या वर्षी कर्ज उचलण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा या वर्षी कर्ज उचलणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
चार वर्षे लांबली कर्जमुक्ती याेजना
राज्य शासनाने दाेन कर्ज मुक्ती याेजना राबविल्या. पहिली याेजना २०१६ मध्ये, तर दुसरी याेजना २०१९ मध्ये राबविली. मात्र, प्रत्यक्षात पैसे मिळण्यास २०२० उजाडला आहे. शासनाकडून बँकांना पैसे मिळाल्याशिवाय बँका शेतकऱ्याची कर्जमुक्ती करीत नाहीत, तसेच त्याला नवीन कर्जही देत नाही. नियमित भरणाऱ्यांचे कर्ज माफ हाेणार नाही. अशा अटी शासनाने घातल्या असल्या, तरी आपलेही कर्ज माफ हाेईल. या अपेक्षेने काही नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्ज भरले नाही. त्यामुळे २०१६ ते २०२० पर्यंत पीककर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येते.
कर्जमुक्तीची घाेषणा केल्यानंतर, प्रत्यक्षात दाेन वर्षांनी कर्ज माफ झाले. मध्यंतरीच्या कालावधीत कर्ज घेता आले नाही. मागील वर्षी कर्ज माफ झाल्याने नवीन कर्जाची उचल करण्यात आली आहे. या वर्षी कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज उचलू.
देवाजी तलांडे, शेतकरी
महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेचे पैसे दाेन महिन्यांपूर्वी जमा झाले. त्यामुळे आता आपण कर्जमुक्त झालाे आहाेत. या वर्षी आता आपण कर्ज उचलू. कर्जमुक्ती झाल्यामुळे कर्जाचे संकट दूर झाले आहे.
शिवराम चहांदे, शेतकरी