वनांवर आधारित लघुउद्योगांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा
By admin | Published: January 5, 2016 01:43 AM2016-01-05T01:43:57+5:302016-01-05T01:43:57+5:30
वन आणि वनवासी हेच या जिल्ह्यातील दोन मोठे भांडवल आहेत आणि या दोन भांडवलातच जिल्ह्याच्या आर्थिक
गडचिरोली : वन आणि वनवासी हेच या जिल्ह्यातील दोन मोठे भांडवल आहेत आणि या दोन भांडवलातच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची बिजे दडलेली आहेत. म्हणून वनावर आधारित लघु उद्योगांना बँकांनी कर्ज पुरवठा केल्यास बँकांचाही फायदा होईल व जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॉ. दुर्वेश भोयर, मुरलीधर झंजाळ, जागोबा खेलकर, संचालिका मीरा नाकाडे, शशिकला देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बंग यांनी सरकारशाही व भांडवलशाही पब्लिक सेक्टर व प्रायव्हेट सेक्टर या दोन प्रकारच्या यंत्रणा देशात कार्यरत आहेत. परंतु सरकारशाहीत कार्यक्षमतेचा अभाव व भांडवलशाहीत भ्रष्टाचार, अनैतिकता मोठ्या प्रमाणावर उघडकीस आलेली आहे. या दोघांचाही सुवर्णमध्य म्हणजे सहकार क्षेत्र. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही विज्ञान व तंत्रज्ञानाने अद्यावत अशी बँक असून एक सहकारी बँक म्हणून ज्या अपेक्षा असतात, त्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यात बँक यशस्वी झालेली आहे. या यशात बँकेच्या तरूण नेतृत्वाचा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य उत्कृष्ट असून त्यांचीच पावती म्हणजे हे पुरस्कार होत. तंबाखू, दारू सोडा, धन आरोग्य जोडा असा संदेश याप्रसंगी डॉ. अभय बंग यांनी दिला. बँकेच्या ५४ शाखांच्या माध्यमातून हा संदेश चार लाख ग्राहकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या विकासात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या बँकेच्या नेतृत्वाचा जेव्हा सन्मान होतो, तेव्हा या संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान होत असतो. आपल्या सर्वांची ओळख ही बँक आहे. ही ओळख, ही प्रतिष्ठा भविष्यात अशीच कायम राहावी, यासाठी मी सदैव कटीबध्द असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर संचालन व आभार व्यवस्थापक अरूण निंबेकार यांनी केले. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सेवानिवृत्तांचाही सत्कार
४२०१५ या वर्षात बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले रामभाऊ डोईजड, प्रभूदास कान्हेकर, सुधाकर पाल, प्रभाकर शेंडे, सावजी उंदीरवाडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
४शहरी भागातील शाखा गडचिरोली (शहर), मुख्य कार्यालय गडचिरोली, अहेरी येथील बँक शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील कनेरी, कोरेगाव, मार्कंडादेव व अतिदुर्गम भागातील कोटगुल, मानापूर, पोटेगाव या शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.