लहान व्यावसायिकांना बँकेचे बळ

By admin | Published: October 9, 2016 01:41 AM2016-10-09T01:41:15+5:302016-10-09T01:41:15+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संयुक्त देयता गट ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ...

Bank's strength to small businesses | लहान व्यावसायिकांना बँकेचे बळ

लहान व्यावसायिकांना बँकेचे बळ

Next

संयुक्त देयता गट : २ कोटी ६३ लाखांचे कर्ज उपलब्ध; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार
गडचिरोेली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संयुक्त देयता गट ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत २८० संयुक्त देयता गट स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी १३६ देयता गटाच्या ८०० पेक्षा अधिक सदस्यांना २ कोटी ६३ लाख ३५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर कर्ज कोणतेही तारण न घेता वितरित करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक लहान-मोठे व्यावसायिक आहेत. हा व्यवसाय पुढे वाढविण्यासाठी कर्जाची गरज भासते किंवा व्यवसायातील चढ-उतारादरम्यानही पैसा जवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न मर्यादित राहत असल्याने बचतही नगण्य आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आर्थिक अडचण निर्माण झाल्यास संबंधित व्यवसायिक अडचणीत येतो. अशा वेळेवर संबंधिताला कर्ज उपलब्ध व्हावे, त्याचबरोबर बचतीची सवय लागावी, या उद्देशाने व्यावसायिकांचे संयुक्त देयता गट स्थापन करण्याची परवानगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डकडे मागितली होती. नाबार्डने बँकेला ४०० गट स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात व्यावसायिकांचे गट स्थापन केले. गटामध्ये लहान व्यवसाय करणाऱ्या ५ ते १० पर्यंत व्यावसायिकांचा समावेश आहे. या योजनेमध्ये कर्ज जरी व्यक्तीकरित्या दिले जात असले तरी ते देयता गटाच्या माध्यमातूनच दिले जाते.
आजपर्यंत बँकेने सुमारे २८० देयता गट स्थापन केले असून या गटांमध्ये जवळपास दोेन हजार व्यावसायिकांचा समावेश आहे. यापैकी १३६ गटांना २ कोटी ६३ लाख ३५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. सदर कर्ज जवळपास ८०० व्यावसायिकांना वितरित केले आहे. देयता गट स्थापन करण्यात आल्यामुळे कर्ज फेडण्याची जबाबदारी ही सामूहिक स्वरूपाची बनते. याच उद्देशाने सदर देयता गट स्थापन करण्यात येऊन त्यांना कोणतेही तारण न घेता कर्जाचे वितरण केले जात आहे. गडचिरोली शहरात २०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. देयता गटाला १ ते ३ लाख रूपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्ज फेड झाल्यानंतर आणखी नव्याने कर्जाचे वितरण केले जाते. त्यामुळे सदर योजना लहान व्यावसायिकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावित आहे. (शहर प्रतिनिधी)

अडचणीच्या वेळी संयुक्त देयता गटाची मदत
सलून व्यवसाय, किराणा दुकान, चिकन सेंटर यासारख्या लहान व्यावसायिकांची पत बँकेसमोर अत्यंत कमी आहे. त्यामुळे बँका या व्यावसायिकांना कर्ज देण्यास तयार होत नाही. बँका कर्ज देण्यास तयार झाल्या तरी तारण असणे आवश्यक आहे. मात्र संयुक्त देयता गटामध्ये सहभागी नागरिकांना कोणतेही तारण न देता कर्ज उपलब्ध होते. व्यवसाय करताना अनेक चढ-उतार येतात. यावेळी सदर देयता गटातील सदस्याला सहजपणे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे अशा प्रकारचे देयता गट स्थापन करून कर्ज घेण्याकडे व्यावसायिकांचा ओढा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सामूहिक जबाबदारी राहत असल्याने कर्ज बुडण्याचीही शक्यता कमी राहते. परिणामी बँकही या गटांना कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Web Title: Bank's strength to small businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.