आस्था व औषधी गुणसंपन्नतेमुळे वटवृक्ष पूजनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:25 AM2021-06-24T04:25:27+5:302021-06-24T04:25:27+5:30

वटपौर्णिमेचा दिवस जसा महिलांसाठी सौभाग्याचा, तसाच वटवृक्षासाठीही अत्यंत भाग्याचा. वर्षातून केवळ एकदाच पूजला जाणारा हा वृक्ष इतर वेळी ...

The banyan tree is revered for its faith and medicinal properties | आस्था व औषधी गुणसंपन्नतेमुळे वटवृक्ष पूजनीय

आस्था व औषधी गुणसंपन्नतेमुळे वटवृक्ष पूजनीय

Next

वटपौर्णिमेचा दिवस जसा महिलांसाठी सौभाग्याचा, तसाच वटवृक्षासाठीही अत्यंत भाग्याचा. वर्षातून केवळ एकदाच पूजला जाणारा हा वृक्ष इतर वेळी मात्र दुर्लक्षित राहतो. वडाच्या झाडाखाली गतप्राण झालेला सत्यवान पुन्हा जिवंत झाला होता, ही सावित्रीची पौराणिक कथा सर्वांनीच ऐकलेली. वटपौर्णिमेला विवाहित महिला वडाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुताचे फेरे घालतात, ही परंपराही अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे, मात्र यामागच्या शास्त्रीय कारणांचा शोध खूप कमी लोकांनी घेतलेला.

पूर्वीच्या काळी ना गॅस, ना इंडक्शन शेगडी. माजघरातल्या भडकत्या चुलीसमोरच प्रत्येक महिला राबत असायची. डोळ्यात पाणी अन् श्वासात धूर. अशावेळी त्यांना गरज असायची शुद्ध हवेची, ऑक्सिजनची. त्यासाठी वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना महिला वडाच्या झाडाजवळ थांबल्या तरी आरोग्यात फरक पडायचा.

महिलांचे आरोग्य जपणारा हा वटवृक्ष आयुर्वेदात खास महत्त्वाचा आहे. वृक्षाच्या पारंबीपासून मुळापर्यंत आणि फुलापासून फळापर्यंत प्रत्येक अवयव आरोग्यवर्धक आहे. या वृक्षात अनेक औषधी गुण दडले आहेत. आरोग्यवर्धक गुण व अध्यात्म या संयोगातून उत्सव साजरा होतो.

वडाचे आयुर्वेदातील महत्त्व

वडाचे वृक्ष हे प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मामुळे ओळखल्या जाते. वडाच्या वृक्षाची पाने, दूध (चीक), मुळे व फांद्या औषधी गुणधर्मयुक्त आहेत. वडाचे झाड हे अ‍ॅन्टी ऑक्साईड दुखण्यावर, अतिसार, मधुमेह, त्वचाविकार यासारख्या आजारावर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार वडाच्या झाडाचे अर्क हे गर्भवती स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत जर टाकले तर त्या स्त्रीचे आरोग्य उत्तम राहते व होणारे बाळ हे दीर्घायुषी होते. वडाच्या झाडापासून घरगुती औषधीसुद्धा बनविता येते. वडाच्या झाडाची पाने ही त्वचेवरील फोड, सांधेदुखी, सांधे सुजणे, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाचे दूध हे तोंडाचा दुर्गंध, दात हलणे, रक्तार्श (मूळव्याध), डोळ्याचे आजार, पायाला भेगा पडणे, सांधेदुखी यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाचे मूळ हे अतिसार, पिंपल, केसाचे विकार यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाच्या फांद्या मुखाचा अल्सर, तोंडाचा दुर्गंध, वारंवार लघवी लागणे, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. वडाचे वृक्ष हे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे आहे.

पूजा व सूत गुंडाळण्याचे पौराणिक महत्त्व

सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळाल्याने ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्रीने ज्याप्रमाणे सत्यवानासाठी व्रत करून त्याचे प्राण परत मिळविले, अशी पौराणिक मान्यता आहे. महिला त्याप्रमाणेच वटसावित्री व्रत आचरतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीला स्मरून आयुष्य वाढविण्यासाठी याचना करतात.

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायूमंडलात प्रक्षेपित करतात, असा समज आहे. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सूत गुंडाळले जाते, त्यावेळी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील तत्त्वांच्या संयोगामुळे लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात, असेही मानले जाते. वटवृक्ष दीर्घायुषी असल्याने महिला सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात.

Web Title: The banyan tree is revered for its faith and medicinal properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.