बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना
By संजय तिपाले | Published: October 11, 2023 05:24 PM2023-10-11T17:24:54+5:302023-10-11T17:25:25+5:30
पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु
गडचिरोली : खेळणीप्रमाणे हल्ली लहान मुलांच्या हाती मोबाइल आहेत. मात्र, या मोबाइलमध्ये डोके घालून बसलेली मुले नेमकी काय करत आहेत, काय पाहत आहेत, याकडे पालकांचे लक्ष नसते, त्यामुळे मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांची काळजी वाढविणारी अशीच एक घटना ११ ऑक्टोबरला अहेरीतून आली आहे. पब्जी गेमच्या आहारी गेलेला १४ वर्षीय मुलगा दोन मजली इमारतीवरुन कोसळला, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
अहेरी येथील पॉवर हाऊस मार्गाच्या हॉकी ग्राउंड जवळील दुमजली इमारतीत राहणाऱ्या एका नामांकित शाळेतील नववीच्या वर्गात शिकणारा मुलगा पब्जी गेमच्या आहारी गेलेला आहे. १० ऑक्टोबरला तो छतावर जाऊन मोबाइलवर पब्जी गेम खेळत होता. गेम मध्ये तो एवढा व्यग्र झाला की चालत- चालत तो थेट इमारतीवरुन खाली कोसळला.
त्याला तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, छातीसह हाताचे हाड फ्रॅक्चर असल्यान अधिक उपचारााठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
शाळकरी व महाविद्यालयीन मुलांच्या हाती सहजपणे मोबाइल पडतात. मुले ऑनलाइन गेम्सच्या आहारी जातात. यातील काही ॲप्स हे पैसे मोजून घ्यावे लागतात तर काही ॲप्स हे विनामोबादला डाऊनलोड होतात. या गेमस्च्या आहारी गेलेल्या मुलांचे अभ्यासाकडे तर लक्ष नसतेच, पण जेवण, झोपही ते विसरुन जातात. त्यात अपयशी झाल्याने काही मुले खचून जातात, यातून ते टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणे आवश्यक बनले आहे.