प्रशिक्षणाचा योग्य उपयोग व्हावा
By admin | Published: June 11, 2014 12:04 AM2014-06-11T00:04:14+5:302014-06-11T00:04:14+5:30
शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक
तज्ज्ञांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण : उल्हास नरड यांचे आवाहन
गडचिरोली : शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले.
इयत्ता ३ रीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत तालुकास्तरीय तज्ज्ञांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण येथील कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी नरड बोलत होते.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. रमतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. जी. चापले, संजय मेश्राम, प्रा. पाईकराव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यु. एन. राऊत, आर. व्ही. आकेवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी वडपल्लीवार, गौतम मेश्राम, लता चौधरी, संध्या चिलमवार, बोईनवार उपस्थित होते. पुढे बोलतांना शिक्षणाधिकारी नरड म्हणाले, जिल्ह्यातील एकही मुल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येकाला शिक्षण मिळणे हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करावे, शिक्षकांच्या व्यक्तीमत्वाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव पडतो. यामुळे शिक्षकांनी स्वत:चे व्यक्तीमत्व आदर्श ठेवायला हवे. तेव्हाच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुजाण भावी पिढी निर्माण होईल, असेही शिक्षणाधिकारी नरड यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौरे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यु. एन. राऊत, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार संध्या चिलमवार यांनी मानले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ९९, तालुकास्तरीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. याप्रसंगी गौतम मेश्राम, धनंजय चापले, रमतकर यांनीही मार्गदर्शन केले. घेतलेल्या प्रशिक्षणाचा विद्यादानाच्या कार्यात नक्कीच उपयोग होणार असून त्याची फलश्रुती हमखास मिळणार, असा विश्वास सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. (स्थानिक प्रतिनिधी)