अन्यायाची जाणीव असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:11 AM2018-10-01T00:11:16+5:302018-10-01T00:12:19+5:30
७ आॅगस्ट १९९० ला मंडल आयोग लागू होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : ७ आॅगस्ट १९९० ला मंडल आयोग लागू होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय कायम आहे. या अन्यायाविरुद्ध ओबीसी समाज एकत्र जोपर्यंत येणार नाही. तसेच ओबीसींना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होणार नाही. तोपर्यंत समाजावर अन्याय होत राहिल. याकरिता अन्याय व समस्यांची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपूरचे इंजिनिअर अरविंद माळी यांनी केले.
येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा आष्टीच्या वतीने ओबीसी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा देशमुख होत्या. प्रमुख अतिथी प्रा. दिनकर हिरादेवे उपस्थित होते .
पुढे बोलताना अरविंद माळी म्हणाले, समाजावरील अन्याय जेव्हा वाढतो तेव्हा असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी समाजात एकता निर्माण करावी.
प्रास्ताविक एन. एस. बोरकुटे , संचालन प्रा. इंगोले यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेला महिला व पुरुष समाजबांधव उपस्थित होते.
गावागावात जनजागृती हवी
बहुसंख्य असलेला ओबीसी समाज विखुरला आहे. या समाजातील समस्यांविषयी जनजागृतीसाठी गावागावांत प्रबोधन होणे आवश्यक आहे. जनजागृती झाल्यास समाज एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल, असे प्रतिपादन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केले.